पुणे : थंडी सुरू झाल्यानंतर श्वसनविकारांमध्ये सर्वसाधारणपणे वाढ होते. यंदा अशा रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. दिवाळीच्या कालावधीत प्रदूषणामुळे बिघडलेली हवेची पातळी याला कारणीभूत ठरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या फुफ्फुसरोगाच्या धोक्याकडे श्वसनविकारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
यंदा दिवाळीत फटाक्यामुळे पुण्यातील हवेची पातळी खालावली. हवा गुणवत्ता निर्देशांक खराब पातळीवर पोहोचला. दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीपासून थंडी वाढू लागताच श्वसनविकाराचे रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येतात. याचबरोबर हवामानात अचानक झालेला हा बदल विषाणूंच्या वाढीस पोषक ठरतो. यामुळे विषाणूसंसर्गांमध्येही या काळात वाढ होते. यंदा दिवाळीनंतर श्वसनविकाराचे रुग्ण वाढले आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१९ या अभ्यासानुसार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) म्हणजेच दीर्घकालीन अवरोधी फुफ्फुसरोग हा सर्वात प्रचलित परंतु कमी ओळखला जाणारा श्वसन विकार आहे. सीओपीडीचा त्रास सुमारे ५.५ कोटी भारतीयांना आहे. हे देशातील मृत्यूंचे दुसरे प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर सीओपीडीच्या वाढत्या धोक्याकडे श्वसनविकारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा-कात्रज भागात जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा
याबाबत श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी म्हणाले की, सीओपीडीसारख्या दीर्घकालीन श्वसनरोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी लवकर निदानासोबत उपचार महत्त्वाचे आहेत. स्पायरोमेट्री ही फुफ्फुसाची कार्यक्षमता चाचणी आहे. तिच्या आधारे सीओपीडीचे लवकर निदान करता येते. अनेक जण वृद्धत्व, सामान्य फ्ल्यू किंवा धूम्रपान करणाऱ्यांचा खोकला म्हणून प्राथमिक लक्षणे नाकारतात. म्हणून रुग्णांना या आजाराबाबत योग्य माहिती मिळायला हवी.
रुग्णांसाठी ‘ब्रीदफ्री’ उपक्रम
जगभरात दरवर्षी २० नोव्हेंबरला जागतिक सीओपीडी दिन साजरा केला जातो. सीओपीडीच्या रुग्णांना निदानापासून उपचारापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी ब्रीथफ्री उपक्रम राबविला जात आहे. रुग्णांना दैनंदिन व्यायाम आणि तंदुरूस्त राहण्यासाठीची माहिती या उपक्रमांतर्गत दिली जात आहे. ‘ब्रीदफ्री’ उपक्रमाची सर्व माहिती http://www.breathefree.com पुढील संकेतस्थळावर रुग्णांना उपलब्ध होत असून, त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे.
आणखी वाचा-लोकजागर : राजकारण्यांना हे लक्षात आलेय का?
प्रदूषणामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ होत आहे. दिवाळीच्या काळात पुण्यातील हवा प्रदूषणामुळे विषारी बनली होती, त्यामुळे अशा रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. याचबरोबर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येही हा धोका वाढत आहे. रुग्णांनी त्रास सुरू झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. -डॉ. संजय गायकवाड, प्रमुख, श्वसनरोगशास्त्र विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय
© The Indian Express (P) Ltd