बॅटरीवर चालणारी, प्रदूषण न करणारी आणि फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेली खास रिक्षा ज्येष्ठांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली असून या आगळ्या वेगळ्या आणि नि:शुल्क सेवेचा लाभ रोज चारशे ते पाचशे नागरिक घेत आहेत.
शहरातील असुरक्षित वाहतूक आणि सर्व रस्त्यांवर असलेली वाहनांची मोठी संख्या यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणे अवघड झाले आहे. अनेक रस्त्यांना पदपथही आहेत; पण तेही विक्रेत्यांनी आणि अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. तसेच अनेक पदपथांवर महापालिकेने,वीज मंडळाने, पीएमपीनेही अतिक्रमण केले आहे. अशा परिस्थितीत ज्या ज्येष्ठांकडे स्वत:चे वाहन नाही त्यांची चांगलीच गैरसोय होते. रिक्षाने जायचे तर ते जवळचे भाडे नाकारतात, त्यामुळे जवळच्या ठिकाणी पायी जाणेही ज्येष्ठांसाठी कष्टप्रद झाले आहे. यावर उपाय म्हणून एक खास रिक्षा तयार करण्यात आली असून या रिक्षेतून नि:शुल्क प्रवासाचा लाभ सध्या रोज शेकडो ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांच्या कल्पनेतून ही रिक्षा तयार झाली आहे. सातारा रस्ता आणि मार्केटयार्डच्या परिसरात तसेच प्रेमनगर, कृतार्थ सोसायटी, ऋतुराज सोसायटी (प्रभाग ६६, महर्षीनगर) या परिसरात ही सेवा दिली जाते. रोज या वाहनाच्या शंभर ते सव्वाशे फेऱ्या होतात आणि चारशे ते पाचशे ज्येष्ठ नागरिक लाभ घेतात.
ही रिक्षा बॅटरीवर चालते. त्यामुळे इंधनाच्या खर्चात बचत होते आणि हे वाहन पूर्णपणे प्रदूषणविरहित आहे. तसेच ध्वनिप्रदूषणही होत नाही. समोरासमोर असलेल्या आसनांवर पाच ते सहा व्यक्ती बसू शकतात आणि फक्त ज्येष्ठांसाठीच ही रिक्षा फिरवली जाते. त्यातून त्यांना प्रभागात ठरलेल्या भागामध्ये कोठूनही कोठेही नेले-आणले जाते. त्यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही, असे चोरबेले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्याचा मोबाईल क्रमांक प्रभागात सर्व घरी पत्र पाठवून कळवण्यात आला आहे. ज्यांना रिक्षाची गरज असेल त्यांनी मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर काही मिनिटातच रिक्षा दारात उभी राहते. तेथून ज्येष्ठ मंडळींना जिथे जायचे असेल, तेथे सोडले जाते. या प्रवासात वाटेत कोणी विनंती केल्यास, त्या नागरिकांनाही रिक्षात घेतले जाते. नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या हस्ते या रिक्षाचे उद्घाटन करण्यात आले आणि तेव्हापासून मोठय़ा संख्येने ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत.

 

या वाहनामुळे ज्येष्ठांना मंदिरात तसेच बागेमध्ये वा अन्यत्र फिरायला आणि जवळच्या ठिकाणी जाणे सहजशक्य झाले असून त्यांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.
– प्रवीण चोरबेले

Story img Loader