पुणे : देशातून ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंबाची निर्यात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून १२९६ किलो डाळिंबाची निर्यात करण्यात आली. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाने २०२० मध्ये भारतातून डाळिंब आयातीला परवानगी दिली होती. त्यानंतर उभय देशांमध्ये आयात-निर्यातीविषयीची कार्य योजना निश्चित होऊन स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यानुसार ऑस्ट्रेलियाला होणारी डाळिंबाची निर्यात माईट वॉश, सोडिअम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग आदी प्रक्रियांसह विकिरण प्रक्रिया करून निश्चित मानांकानुसार बॉक्समध्ये पॅकिंग करून डाळिंब निर्यात करावी लागते. या सर्व सुविधा वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावर कार्यरत करून ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधींकडून त्याची तपासणी करून ही डाळिंब निर्यात करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), पणन मंडळ आणि के. बी. एक्स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही निर्यात करण्यात आली आहे. निर्यात करण्यात आलेली डाळिंबे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या फाइन फूड ऑस्ट्रेलिया प्रदर्शनात अपेडामार्फत ठेवली जाणार आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियातून डाळिंबांना मागणी असल्यामुळे अनेक निर्यातदार पुढे येत आहेत. यापुढे नियमित निर्यात सुरू राहील, अशी माहिती पणन विभागाचे निर्यात व्यवस्थापक सतीश वराडे यांनी दिली.
हेही वाचा – आणखी दोन दिवस पाऊस; जाणून घ्या, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला दिलेले इशारे
हेही वाचा – राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर… यंदा किती शिक्षक ठरले मानकरी?
भारत जगातील सर्वांत मोठा डाळिंबउत्पादक देश आहे. सन २०२३-२४ मध्ये ७२ हजार टन डाळिंबांची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय डाळिंबांना चांगली मागणी वाढत आहे. पणनच्या निर्यात सुविधा केंद्रावरून खासगी निर्यातदारांसह, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी म्हटले आहे.