Pooja Khedkar Medical Certificate : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. परंतु, यासाठी त्यांनी २०२२ मध्ये पुण्यातील औंध रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. परंतु, डॉक्टरांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. यासंदर्भात एनडीटीव्हीच्या हाती हे कागदपत्र आले आहे.
“लोकोमोटर अपंगत्वाचं प्रमाणपत्रासाठी तुम्ही २३ ऑगस्ट २०२२ रोजी अर्ज केला होता. तुमच्या अर्जानुसार ११ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमची चाचणी करण्यात आली. त्यानुसार आम्हाला सांगायला खेद वाटतो की असं प्रमाणपत्र देणं शक्य नाही”, असं पुण्यातील औंध रुग्णालयाने पत्राद्वारे पूजा खेडकर (Pooja Khedkar) कळवलं होतं. एनडीटीव्हीने या पत्रानुसार वृत्त दिलं आहे.
औंध रुग्णालयाने प्रमाणपत्र देण्यास हरकत दाखवल्यानंतर त्यांना पिपरी येथील रुग्णालयाने हे प्रमाणपत्र दिलं. पिपरी रुग्णालयाने खेडकर (Pooja Khedkar) यांना डाव्या गुडघ्याच्या अस्थिरतेचं निदान केलं होतं. त्यानुसार त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र त्यांना दिलं होतं.
हेही वाचा >> Pooja Khedkar प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांनी मागविला
वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणते प्रमाणपत्र सादर केले होते?
२००७ मध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयात अर्ज करताना त्यांनी अनेक प्रमाणपत्र सादर केल्याचेही समोर आले आहे. “पूजा खेडकर यांनी (Pooja Khedkar) २००७ मध्ये प्रवेश घेतला. त्यांना CET (कॉमन एंट्रन्स टेस्ट) द्वारे प्रवेश मिळाला, जिथे त्यांनी आरक्षणाचे प्रमाणपत्र दिले. त्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देखील सादर केले. परंतु, त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात अपंगत्वाचा कोठेही उल्लेख नाही”, असं काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालयाचे संचालक अरविंद भोरे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
दरम्यान, हे प्रकरण बाहेर आल्यापासून पूजा खेडकर (Pooja Khedkar) चर्चेत आहेत. त्यांच्यावर सर्वत्र टीका होतेय. परंतु, यातही सत्य बाहेर येईल, याची खात्री आहे, असा विश्वास पूजा खेडकर यांनी व्यक्त केला आहे. तसंच, मी दोषी असल्याचं सिद्ध करणारी मीडिया ट्रायल चुकीची आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
पूजा खेडकर यांच्यावर कारवाई व्हावी!
खेडकर (Pooja Khedkar) यांनी भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी वेगवेगळी दिव्यांग प्रमाणपत्रे मिळविल्याचे आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग संघटनेने राज्य अपंग कल्याण आयुक्त डाॅ. प्रवीण पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत दिव्यांग संघटनेकडून अपंग कल्याण आयुक्तांना तक्रार अर्जही देण्यात आला होता. संबंधित प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. अशा गैरप्रकारांमुळे पात्र दिव्यांग उमेदवार सुविधांपासून वंचित राहतात, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर डाॅ. पुरी यांनी संंबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी सूचना केली. संबंधित तक्रार अर्ज दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. याबाबतचा तपास आणि चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र कोणी दिले, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.