पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील डांबरी व सिमेंट रस्त्याच्या विकासकामाचा निविदा स्वीकृत दर ४० टक्क्यांपेक्षा कमी दराने आल्याने १५ कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या कामाच्या ठेकेदारांकडून पैसे वसूल केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डांबरी व सिमेंट रस्त्याच्या कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्न विचारला हाेता. रस्त्याच्या कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत आलेल्या ४४ तक्रारींची पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करून सहा महिन्यांपूर्वी चाैकशी अहवाल महापालिकेला सादर केला आहे. चाैकशी अहवालात रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असून कामे निकृष्ट दर्जाची असताना प्रशासनाच्या संगनमताने कंत्राटदाराने काेट्यवधी रुपयांची बाेगस देयके काढली आहेत. कनिष्ठ, उप अभियंता, कार्यकारी अभियंता व ठेकेदारांवर चाैकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे का, याप्रकरणी कंत्राटदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर काेणती कारवाई केली आहे, अशी विचारणा आमदार जगताप यांनी केली.
हेही वाचा >>>पुणे : लष्कर न्यायालयात मिळणार आता लवकर ‘न्याय’… घेतला ‘हा’ निर्णय
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महापालिकेतील काही कामांचा आलेला स्वीकृत निविदा दर ४० टक्क्यांपेक्षा कमी दराने आला आहे. त्या कामांपैकी १५ कामांच्या गुणवत्ता व दर्जा तपासणीकामी महापालिकेमार्फत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) यांच्याकडे देण्यात आले हाेते. त्यांनी कामाची तपासणी केली असून महापालिकेला अहवाल प्राप्त झालेला आहे. अहवालामध्ये काही कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. काही ठिकाणी कामांची ठेकेदारांकडून दुरुस्ती किंवा कामाची रक्कम वसूल करून घेण्याबाबत नमूद केले आहे. अहवालाच्या अनुषंगाने महापालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारांकडून याेग्य ती दुरुस्ती किंवा रक्कम वसुली तसेच काेणी ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी दाेषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सीओईपीच्या अहवालातील शिफारशीनुसार कारवाई केली जाणार आहे. स्थापत्य विभागामार्फत त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.