अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सध्याच्या पद्धतीनुसार निवडणूक घेतली जावी, की ज्येष्ठ साहित्यिकाची अध्यक्षपदी नियुक्ती करावी हा साहित्य महामंडळासमोरचा पेच कायम आहे. यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिकांनी साहित्य महामंडळास योग्य मार्गदर्शन करावे यासाठी राज्यभरातील शंभर जणांना पत्रे पाठविली होती. मात्र, त्याला अत्यल्प म्हणजे केवळ १० टक्के प्रतिसाद मिळाला असल्याने यंदाही निवडणूकच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे दरवर्षी साहित्य संमेलनाचे वेध लागल्यानंतर साहित्य महामंडळातर्फे संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते आणि अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना राज्यातील आणि बृहन महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत पोहोचणे मुश्कील होऊन जाते. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची दगदग सहन न झाल्यामुळे ‘बलुतं’कार दया पवार आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत हे ज्येष्ठ साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यानंतर संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक नको अशी मागणी सातत्याने होऊ लागली. ‘संमेलन अध्यक्षपद हे सन्मानाचे पद असून ते सन्मानानेच दिले जावे’, अशी भूमिका सातत्याने मांडली जाते. निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर या भूमिका हवेत विरुन जातात. मग साऱ्यांना पुढील वर्षीच्या निवडणुकीच्यावेळेसच पुन्हा या भूमिकेची आठवण होते. हे चित्र दरवर्षी साहित्य जगत अनुभवत आहे.
संमेलनाध्यक्षपद सन्मानाने दिले जावे या भूमिकेशी सहमत असलेल्या साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘संमेलन अध्यक्षपदासंदर्भात मार्गदर्शन करावे’, अशी विनंती करणारे पत्र राज्यभरातील शंभर ज्येष्ठ साहित्यिकांना पाठविले होते. या घटनेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, त्याला अगदीच अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. केवळ नऊ ते दहा साहित्यिकांनी महामंडळाच्या पत्राला उत्तर दिले आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मांडवाखालून गेलेल्या तीन माजी अध्यक्षांचा त्यामध्ये समावेश आहे, अशी माहिती महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, या माजी संमेलनाध्यक्षांची नावे सांगण्यासंदर्भात त्यांनी मौन बाळगले.
साहित्य महामंडळाच्या या आवाहनाला प्रतिसाद लाभला असता तर त्यानुसार साहित्य महामंडळाच्या घटनेमध्ये निवडणुकीसंदर्भातील सुधारणांची दुरुस्ती करणे शक्य झाले असते. मात्र, ज्या काही मोजक्या लोकांनी पत्राला उत्तर दिले आहे त्या सर्वाचा ‘आपण लोकशाही स्वीकारली असल्यामुळे निवडणूक अपरिहार्य आहे’, असाच सूर आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान ज्येष्ठ साहित्यिकाला प्रदान केला जावा, या साहित्य महामंडळाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे, याकडेही या सूत्राने लक्ष वेधले.