Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यात १९ तारखेला एका पोर्श कार चालवणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतल्या अल्पवयीन मुलाने दोघांना उडवलं. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया अशी मृतांची नावं आहेत. या दोघांना उडवल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. पण त्यानंतर १५ तासांमध्ये जामीन मिळाला. ज्यामुळे सोशल मीडिया आणि पुण्यात चांगलाच संताप झालेला पाहण्यास मिळाला. त्यानंतर या अपघाताबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तसंच अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अशात आता प्रत्यक्षदर्शी संकेत आणि आमीन शेख या दोघांनीही अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शी संकेतने नेमकं काय सांगितलं?
“पोर्श कारची स्पीड लिमिटच नव्हती. पोर्श इतक्या वेगात आली की त्या वेगात या कारने दोघांना धडक दिली. मुलगी (अश्विनी कोस्टा) १५ फूट वर उडाली आणि खाली वेगाने खाली पडली जागीच तिचा मृत्यू झाला. तो मुलगा (अनिश अवधिया) स्विफ्ट कारच्या जवळ पडला. एका ज्युपिटरवर चाललेल्या माणसालाही त्या कारने उडवलं. पोर्श कारच्या एअरबॅग्ज उघडल्या. आम्ही धावत जाऊन पुढे पाहिलं तर तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र त्या कारमध्ये होते. मी आणि माझे काही मित्र होते आम्ही त्या मुलाला (अल्पवयीन मुलगा) पकडून आणलं. त्यावेळी त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं.” असं संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. इंडिया टुडेशी चर्चा करताना त्याने ही घटना सांगितली.
हे पण वाचा- Porsche Accident: “अल्पवयीन मुलासाठी अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन?” अंजली दमानियांचा आरोप काय?
एअरबॅग्ज उघडल्या होत्या आणि कार पुढे जाऊन थांबली होती
“कार पुढे जाऊन थांबली होती. त्यांना पळून जाण्यासाठी काही संधी मिळाली नाही. कारण एअरबॅग्ज उघडल्या होत्या. त्यामुळे त्यांना पळून जाताच आलं नाही. त्यावेळी तो अल्पवयीन मुलगा आणि इतर दोन मित्र होते. पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली. तो मुलगा नशेमध्ये होता. त्याला कुणी पकडलं आहे मारलं आहे हे त्याला काही कळतच नव्हतं. तो फोनवर वगैरे बोलायचा प्रयत्न करत होता. जास्त काही बोलला नाही. अपघात झाल्यानंतर पोलीस घटनास्थळावर लगेच आले. फारतर एक ते दीड मिनिटांचा अवधी गेला असेल पण पोलीस तिथे लगेच आले होते. त्यांनी अपघात झालेली कार पाहिली. त्यानंतर आधी अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात नेलं, त्यानंतर इतर दोघांना पोलीस घेऊन गेले. मी पोलीस ठाण्यात गेलो नव्हतो. पण खूप गर्दी झाली होती. मी तेव्हा इथेच थांबलो होतो. लोकांनी त्याला चांगलंच मारलं होतं. काही लोकांनी त्याला ओळखलं, की तो बिल्डरचा मुलगा आहे.”
प्रत्यक्षदर्शी आमिन शेख यांनी काय सांगितलं?
“मी त्या ठिकाणी थांबलो होतो. उजवीकडे कुठलीही गाडी नव्हती. समोरुन गर्दी झाली होती. दोन रिक्षाचालक होते रस्त्याच्या मधे पोहचणार इतक्या अत्यंत वेगात पोर्श कार माझ्या मागून गेली. रस्ता क्रॉस करतानाच कार माझ्या मागून गेली आणि जोरात धडकेचा आवाज आला. मुलगी (अश्विनी कोस्टा) माझ्यासमोर वर उडाली आणि जोरात खाली आदळली. ती ऑन स्पॉट तिथल्या तिथे गेली. तिच्यासह असलेला मुलगाही बाजूला पडला होता. एक कपडा त्या मुलीच्या आणि मुलाच्या अंगावर टाकला, आम्ही कारजवळ गेलो कार पुढे जाऊन थांबली होती. अल्पवयीन चालकाला लोक मारत होते. आम्ही पोलिसांना बोलवलं. दोन मुलं पुढे बसली होती. तेव्हा तो मुलगा म्हणत होता आम्हाला मारु नका काय पैसे असतील ते घ्या आणि आम्हाला सोडा. ही ऑफर सगळ्यांना तो कार चालक मुलगा देत होता. जेवढं नुकसान झालंय आम्ही भरुन देतो. तितक्यात पोलीस आलेच. त्या मुलाला आणि आणि त्याच्या मित्राला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं. तो मुलगा खूप दारु प्यायला होता. त्यांना पाहूनच ते प्यायलेत हे कळत होतं. त्यांना मारत होते पण मार लागतही नव्हता. आम्हाला मारु नका आम्ही पैसे देतो असं तो मुलगा तीन-चारवेळा सांगत होता. कारमध्ये तीन मुलं होती. त्यांना जमावाने मारलं. ज्यांना मारत होते ते दोघंही तेच सांगत होते की आम्ही हवे तितके पैसे देतो.” असं आमिन शेख यांनी सांगितलं.
पोलिसांनी मला बोलवून घेतलं. आयुक्त कार्यालय आणि शास्त्रीनगर पोलीस चौकीत मला दोनदा बोलवण्यात आलं होतं. त्यांनी माझा जबाब नोंदवून घेतला असं आमिन शेख यांनी सांगितलं. आमिन शेख हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना ही माहिती दिली.