पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्श कारने दोघांना चिरडल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. हे प्रकरण अद्यापही चर्चेत आहे. याप्रकरणी आता रोज नवीन कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, आता पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार असल्याचे पुढे आलं आहे. बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांनी ही परवानगी दिली आहे.
एएनआयने पुणे पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे दिले होते. त्यानुसार आता बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांनी आरोपीच्या चौकशीची परवानगी दिली आहे. उद्या पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळाने यासाठी २ तासांचा वेळ पुणे पोलिसांना दिला आहे. अल्पवयीन चालकाला बालसुधारगृहात ५ जूनपर्यंत ठेवण्यात आलं आहे.
पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली?
दरम्यान, पुणे अपघातप्रकरणात मूळ आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिल आणि आजोबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज पुणे जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याशिवाय या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब पुढे आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे समोर आले आहे. रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोरचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता संस्थाप्रमुख म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.