लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून पुण्यात ही मोटार आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये या मोटारीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू करण्यात आली परंतु, ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलगा पोर्शे मोटार चालवीत होता. तो मोटार भरधाव चालवीत असताना तिची धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात घडला त्या वेळी मोटारीला नोंदणी क्रमांक नव्हता. याबाबत ‘आरटीओ’त विचारणा केली असता, वेगळीच माहिती समोर आली. ही मोटार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती. तेथील वितरकाने या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून ती पुण्यात पाठविली होती.
आणखी वाचा-पिंपरीतील सशुल्क वाहनतळ धोरण बासनात, प्रायोगिक तत्त्वावरील योजनेची मुदत संपली
पोर्शे मोटार पुण्यात आल्यानंतर मार्च महिन्यात नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. त्या वेळी तिची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, तिचा कर आणि इतर शुल्क भरून ही नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती, हे उघडकीस आले आहे.
कल्याणीनगर येथील अपघातातील पोर्शे मोटारीची तात्पुरती नोंदणी बंगळुरूमध्ये झाली होती. पुण्यात या मोटारीच्या नोंदणीची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात आली. मात्र, ती प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. -संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी