सौरऊर्जेवर चालणारे दिवे वाहतूक शाखेत दाखल
पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. शहरात सर्वत्र जाणवत असलेल्या या समस्येवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी छोटेखानी आणि सहजरीतीने हलवता येतील असे वाहतूक नियंत्रण दिवे (पोर्टेबल सिग्नल) घेतले आहेत. एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यास तेथील वाहतूक अन्यत्र वळविण्यासाठी हे दिवे वापरले जातील. विशेष म्हणजे हे दिवे सौरऊर्जेवर चालणारे आहेत. अशा प्रकारचे वाहतूक नियंत्रण दिवे अगदी छोटय़ा चौकात ठेवता येणार असल्यामुळे ते वाहतूक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
शहरातील छोटे रस्ते असोत वा हमरस्ते, दररोज सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यांवर कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा वाहतूक नियंत्रण दिवे बसविणे शक्य नाही. एखाद्या रस्त्यावर कोंडी झाल्यास तेथील वाहतूक वळविण्यासाठी तसेच कोंडी सोडविण्यासाठी छोटेखानी वाहतूक नियंत्रण दिवे उपयुक्त ठरतात. अशा प्रकारचे दिवे वाहतूक शाखेकडे दाखल झाले आहेत. त्यापैकी एक दिवा पोलीस आयुक्तालयासमोरील चौकात बसविण्यात आला आहे. त्यामुळे तेथील वाहतुकीचे नियंत्रण करणे शक्य झाले आहे.
या संदर्भात माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे म्हणाले, की अशा प्रकारचे आठ वाहतूक नियंत्रण दिवे वाहतूक शाखेकडे आले आहेत. त्यापैकी पाच दिवे हे संगणक क्षेत्रातील पर्सिस्टंट या कंपनीने वाहतूक शाखेला दिले आहेत. तर तीन दिव्यांची वाहतूक शाखेकडून खरेदी करण्यात आली आहे. सध्या पोलीस आयुक्तालयासमोरील चौकात छोटेखानी वाहतूक नियंत्रण दिवा बसविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दिवे सौरऊर्जेवर चालणारे आहेत. वाहतूक नियंत्रण दिव्याच्या वरील बाजूस सौरऊर्जेचे पॅनेल बसविण्यात आले आहे. तसेच तळाच्या बाजूला चाके असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येतात. विमाननगर परिसरात छोटेखानी वाहतूक नियंत्रक दिवा लवकरच बसविण्यात येणार आहे.
एखाद्या रस्त्यावर अचानक वाहतूक कोंडी झाल्यास तसेच तेथील वाहतूक वळविण्यासाठी हे दिवे उपयुक्त ठरणार आहेत. शहराच्या कोणत्या भागात अशा प्रकारचे दिवे बसविण्याची गरज भासणार आहे त्या चौकांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. जेथे वाहतूक कोंडी होते तेथे छोटे वाहतूक नियंत्रण दिवे बसविण्यात येतील. एरव्ही कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण दिवा बसविण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण दिवे विजेवर चालतात. वीजपुरवठा खंडित झाल्यास पोलिसांची तारांबळ उडते. छोटे वाहतूक नियंत्रण दिवे हलविता येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या दिव्यांची मदत होईल, असेही मुंढे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा