लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राज्याच्या अनेक भागांमध्ये सोमवार आणि मंगळवारी (६, ७ मार्च) पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तसेच ठाण्यात गारांचा पाऊस, तर राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही (बुधवार, ८ मार्च) राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या हजेरीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मार्च महिन्याबाबत वर्तवण्यात आलेल्या हवामान अंदाजामध्ये आठ मार्चपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. ठाणे शहर आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारांच्या पावसाचीही नोंद झाली. कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ नोंदवण्यात आली. विदर्भातही किमान तापमान तुरळक वाढलेले पाहायला मिळाले. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत घटलेले दिसून आले, तर उर्वरित राज्यात सरासरीच्या दरम्यानच कमाल तापमानाची नोंद झाली. कोकण वगळल्यास राज्यातील बहुतांश भागांमध्ये सोमवार आणि मंगळवारी पावसाची नोंद झाली.

आणखी वाचा- नवीन मुठा उजवा कालवा मजबुतीकरणासाठी ३५ कोटींची कामे

आज (बुधवार, ८ मार्च) कोकण आणि गोव्यात कोरड्या हवमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची, तर काही भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी मुंबईतील सांताक्रूझ परिसरात सर्वाधिक कमाल (३९.३ अंश सेल्सिअस) तर औरंगाबादमध्ये सर्वात कमी किमान (१३.२ अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader