रिक्षा संघटनांनी मागील अनेक दिवसांपासून केलेली भाडेवाढीची मागणी लक्षात घेता जिल्हा परिवहन प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची रिक्षा संघटना त्याचप्रमाणे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इंधनाचे वाढते दर त्याचप्रमाणे विमा, रिक्षाचे सुटे भाग व रिक्षाची वाढती किंमत लक्षात घेता रिक्षाला भाडेवाढ देण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. या प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा परिहवन प्राधिकरणाच्या वतीने रिक्षा चालकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक घेतली. प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने भाडेवाढीच्या विषयावर काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली.
सजग नागरी मंचच्या वतीने विवेक वेलणकर हे या चर्चेला उपस्थित होते. रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ किंवा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा करण्याबाबत सध्या विचार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यासाठी वाढ देण्याबाबत संस्थांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शविला. मात्र, रिक्षाचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा केल्यास रिक्षाच्या भाडय़ामध्ये किरकोळ वाढ होऊ शकेल. हा प्रस्तावास संस्थांच्या प्रतिनिधींनी तत्त्वत: मान्यता दर्शविली. दीड किलोमीटरचा टप्पा केल्यानंतर साडेसोळाऐवजी सतरा रुपये भाडे होईल. त्यातून जवळचे भाडे नाकारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे वेलणकर यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ तास टोल फ्री क्रमांक ठेवावा, अशी मागणीही चर्चेत करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा