पुणे: लोकसभेला पुण्यात जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. कारण शनिवार-रविवार या दोन सुट्यांच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून ११ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेने २५ आणि २६ नोव्हेंबरला खास मतदार नोंदणी शिबिराचे विविध ठिकाणी आयोजन केले होते. या शिबिरात मतदार नोंदणी, नावांची वगळणी, तपशीलात दुरुस्ती, आधार क्रमांक जोडणी यासाठीचे एकूण ११ हजार ४९६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
या शिबिरांत नवीन मतदार नोंदणीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघात ३३१, आंबेगाव २२७, खेड-आळंदी ५२२, शिरुर २८७, दौंड ६८६, इंदापूर २०१, बारामती ६५८, पुरंदर २४६, भोर २३४, वेल्हा ११२, मुळशी १३९, मावळ ६७२, चिंचवड २६६, पिंपरी २०३, भोसरी १८८, वडगाव शेरी २४८, शिवाजीनगर १२९, कोथरुड १२८, खडकवासला १२२, पर्वती १६१, हडपसर २७२, पुणे कॅन्टोन्मेंट २६६ आणि कसबा पेठ २०६ असे एकूण ६५०४ अर्ज प्राप्त झाले आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सांगितले.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ डिसेंबरपर्यत मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नवमतदारांनी आपले मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. ज्या मतदारांनी नाव नोंदविले आहे त्यांनी मतदार यादीत आपले नाव, छायाचित्रे, पत्ता आदी तपशील पडताळून पाहावे, त्यामध्ये काही बदल असल्यास बदल करावेत. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ या संकेतस्थळाला किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ उपयोजनचा (ॲप) वापर करावा. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी