पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एस.पी. कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. पण मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. तसेच आज सकाळपासून शहरातील अनेक भागात पावसाने सुरुवात केली आहे. आज पुणे शहरासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एस.पी. कॉलेजच्या मैदानावर कार्यक्रम होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा दलाची पथके दाखल
हेही वाचा – ‘ससून’मधील गोंधळानंतर राज्य सरकार सावध! वैद्यकीय अधीक्षकपदाचे निकष बदलण्याची पावले
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दुसर्या पर्यायाचा वापर होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या दृष्टीने स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे प्रशासनामार्फत कार्यक्रमाची तयार करण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्यात आलेले नाही. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही.