आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जागांच्या वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, दोन्ही पक्ष सातत्याने ज्या मतदारसंघात पराभूत होत आहेत, अशा मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून लढवला जातो. ही जागा शिवसेनेने मागितली असून त्या बदल्यात सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या बदलाबाबत भंडारी यांना विचारले असता ते म्हणाले, की युतीच्या जागावाटपाचे सूत्र भाजपा २६ आणि शिवसेना २२ हेच कायम राहील. मात्र, काही जागांची अदलाबदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्ष सातत्याने ज्या जागांवर पराभूत होत आहोत, त्या मतदारसंघांची अदलाबदल करावी, अशी चर्चा आहे. मात्र, तसा निर्णय झालेला नाही.
दोन्ही पक्षांच्या वाटय़ाला आलेल्या जागांमधूनच काही जागा रिपब्लिकन पक्षालाही द्यायच्या आहेत. तसेच राजू शेट्टी यांची संघटना, शेतकरी कामगार पक्ष, विदर्भातील काही छोटे गट व पक्ष अशा काही पक्ष व गटांना आमच्यात सामावून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसविरोधात असणाऱ्या सर्वाना या व्यापक आघाडीत घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे भंडारी म्हणाले.

Story img Loader