पुण्यातील सर्वपक्षीय राजकारणी भित्रट आहेत. याचे कारण शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची त्यांना भीती वाटते. पाणीकपात केली, तर मतदार नाराज होतील आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल, अशी शंका त्यांच्या मनात घेर धरून बसली आहे. सत्ताधाऱ्यांना जेवढी मतांची काळजी, तेवढीच विरोधकांनाही. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाही, कोणीही पुढे येऊन पाणीकपात करण्याची मागणी करत नाही. पाऊस पाडणे हे काही राजकारण्यांच्या हाती नाही. संपूर्ण देशात मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊसमान कमी राहिले. तसेच ते पुण्यातही घडले. त्यात दोष कुणाचाच नाही. तरीही समस्त पुणेकरांना चोवीस तास भरपूर पाणी दिलेच पाहिजे, असा बावळट खटाटोप राजकारण्यांनी करण्याचे खरेतर काहीच कारण नाही. तरीही जलसंपदा विभागाच्या डोक्यावर बसून पुण्याच्या पाणीपुरवठ्याची मागणी मान्य करून घेणाऱ्या या सगळ्यांना कोणीतरी खडसावून विचारण्याची गरज आहे.
पुणे शहराचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गेली चार वर्षे एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. हा निवडणुकीच्या दृष्टीने धोकादायक वाटणारा निर्णय जर तिथे घेतला जाऊ शकतो, तर तो पुण्यात का घेतला जाऊ शकत नाही.
हेही वाचा – पुणे :‘मेफेड्रोन’ प्रकरणात पश्चिम बंगालमधून एकजण ताब्यात
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची जर ही अवस्था असेल, तर पावसाळा येईपर्यंत आपण पाणी कसे पुरवणार आहोत, याचे कोणतेही भान नसणाऱ्या निर्णयकर्त्यांना हे कसे लक्षात येत नाही, की समजा पाऊस उशिराने आला, तोही कमी आला, तर पुढचे अख्खे वर्ष पुण्यासारख्या शहरात पाण्याची किती बोंबाबोंब होईल? मुंबई या राज्याच्या राजधानीतही पाणीकपातीचा निर्णय अटळपणे घेणे भाग पडते आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातून अधिक पाणी मिळावे, यासाठी राज्य शासनाकडे केलेली मागणी मान्य होत नसल्याचे लक्षात येताच तेथे पाणीकपातीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. पुण्याच्या दुपटीहून अधिक लोकसंख्येच्या या महानगरात पाण्याचा प्रश्न उग्र होईल, याचा अंदाज असल्यानेच कपात करण्याचा निर्णय घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
पुणे मात्र सतत चार अंगुळे वर चालणार… तिथे पाण्याची चैन होणार… पाण्याचा दाब कमी झाला की लगेच नाकाच्या शेंड्यावर राग… चार थेंब कमी मिळाले की लगेच थयथयाट… दिवसाच्या कोणत्याही प्रहरात आम्हाला अंगठ्याएवढी धार हवी म्हणजे हवीच… असे पुणेकरांचे जे चित्र राजकारण्यांच्या मनात आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे. आणि समजा ते खरेच असेल, तरी त्यांना गोंजारण्यापेक्षा वस्तुस्थितीची जाणीव करून देणे अधिक महत्त्वाचे. दरवर्षी वाढत चाललेल्या या शहरातील लोकसंख्येला आत्ताच पुरेसे पाणी मिळत नाही, तर आणखी काही दशकांनी या शहराची अवस्था काय असेल, याचा जरा तरी विचार करायला नको?
हेही वाचा – पुण्यात ‘एम्स’ उभे राहणार! अजित पवारांची मोठी घोषणा
शहराला धरणातून मिळणारे पाणी आणि प्रत्यक्षात घरापर्यंत पोहोचणारे पाणी यामध्ये चाळीस टक्क्यांचा फरक आहे. म्हणजे एवढे पाणी झिरपून वाया जाते. एवढा मोठा साठा वाया जात असताना, त्यासाठी युद्धपातळीवर काही करायचे सोडून पालकमंत्र्यांनी मुळशी धरणाची उंची वाढवून तेथून पुण्यासाठी अधिक पाणी मिळवण्याचा प्रयत्न करणे यात कोणता शहाणपणा? रोज एक तास कमी पाणी देणे, दिवसाआड पाणी देणे यांसारख्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील कितीतरी गावांत दोन किंवा अधिक दिवस पाणी मिळत नाही. तेथील नागरिकांच्या तुलनेत पुणेकरांच्या पाण्याच्या चैनीला पारावारच नाही. पाणीकपातीचा निर्णय न घेण्याचा भेकडपणा आता तरी राजकीय क्षेत्रातील मंडळींनी सोडून द्यायला हवा.
mukund.sangoram@expressindia.com