चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अडथळा ठरणारा जुना पूल पाडला जाणार आहे. त्यासाठी नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल ही कंपनी गुरुवारी (८ सप्टेंबर) सादर करण्याची शक्यता आहे.पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.
त्यात वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हे पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीला दिले जाणार आहे. हा पूल स्फोटकांच्या साहाय्याने पाडता येईल किंवा कसे?, की कोणता पर्याय वापरावा लागेल, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
हेही वाचा : पुणे : दस्त नोंदणी करताना होणाऱ्या चुका टळणार
दरम्यान, १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातील जुना अरुंद पूल पाडून महामार्ग सहापदरी करण्याचे ठरविण्यात आले आहे. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिका, संरक्षण विभाग व अन्य विभागांमार्फत अस्तित्वातील उन्नत मार्गावरील पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी आदी सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठीचे काम सुरू झाले आहे.