पुणे : यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात एकूण ३३० लाख टनांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण सततच्या मान्सुनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासह साखर उतारा आणि साखर उत्पादनात वाढ झाली आहे. हंगामअखेर देशात साखर उत्पादन ३४० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात देशात इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आलेल्या साखरेसह एकूण साखर उत्पादन ३६६.२ लाख टन झाले होते. त्यांपैकी सुमारे ४५ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करण्यात आला होता.
यंदाच्या गाळप हंगामात इथेनॉल निर्मितीसाठीच्या साखरेसह देशात एकूण ३३० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण सततच्या मान्सूनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनात वाढ झाली आहे. साखरेच्या उताऱ्यात वाढ होऊन साखर उत्पादनही वाढले आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादनात चांगली वाढ होताना दिसत आहे.
हेही वाचा…धक्कादायक! पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीची आत्महत्या
इंडियन शुगर मिल्स अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलसाठी वापरण्यात आलेली साखरवगळून १५ मार्चअखेर देशात २८०.७९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यनिहाय विचार करता २८०.७९ लाख टनांपैकी सर्वाधिक १००.५० लाख टन उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. उत्तर प्रदेशात ८८.४० लाख टन, कर्नाटकात ४७.५५ लाख टन, गुजरातमध्ये ८.८८ लाख टन, तमिळनाडूत ६.८५ लाख टन आणि देशांतील अन्य राज्यांत २८.६१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
देशभरात यंदाच्या हंगामात ५३२ साखर कारखाने सुरू झाले होते, १५ मार्चअखेर १६१ कारखान्यांनी आपला गाळप हंगाम संपविला आहे. आजघडीला ३७१ कारखाने सुरू असून, एप्रिलच्या मध्यापर्यंत गाळप हंगाम संपण्याचा अंदाज आहे. हंगामाअखेर एकूण साखर उत्पादन ३४० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यातील १७ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होणार आहे. सरासरी ३२० ते ३२३ लाख टन निव्वळ साखर देशात उपलब्ध होणार आहे. देशाला एका वर्षाला सुमारे २७० ते २८० लाख टन साखरेची गरज असते, तर राखीव साठा सुमारे ६० लाख टनांचा असतो.
हेही वाचा…पुणे विद्यापीठात ११ प्राध्यापकांकडे ४० पदांचा अतिरिक्त कार्यभार
इथेनॉल मिश्रण ११.६ टक्क्यांवर
नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०२३-२४ च्या इथेनॉल वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ११.६ टक्क्यांवर गेले आहे. केंद्र सरकारने या वर्षांत इथेनॉल मिश्रणाचे १५ टक्क्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पण इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध पाहता, सरकारने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य दिसत नाही.
इथेनॉलवरील निर्बंध उठविण्याची मागणी
हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात ३३० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. त्यात सरासरी दहा लाख टनांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशाच्या गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन होणार आहे. साखरेचा किमान विक्री दर स्थिर आहे. साखर निर्यातीवर निर्बंध आहेत. शिवाय उसाला आजवरचा उच्चांकी दर (एफआरपी) देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत येणार आहेत. कारखान्यांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली.