एखादी मोठी वस्तू परगावी पाठवायची असेल तर कुरियरच्या माध्यमातून पैसे जास्त खर्च होतात. त्याबरोबरच ते पार्सल व्यवस्थित पोहोचेल ना, ही चिंताही अनेकदा भेडसावते. पार्सल पाठविण्यासाठी होणारा हा खर्च आणि चिंता कमी करण्यासाठी टपाल कार्यालयाने विशेष सेवा सुरू केली आहे. टपाल विभागाने पार्सल पॅक ही सेवा सुरू केली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील टपाल कार्यालय (सिटी पोस्ट), साधू वासवानी चौकातील पुणे मुख्य टपाल कार्यालय आणि चिंचवड पूर्व टपाल कार्यालय येथे दहा रुपयांच्या नाममात्र दरापासून पार्सलच्या वजनानुसार ही सोय उपलब्ध आहे, अशी माहिती पुणे टपाल क्षेत्राचे पोस्ट मास्तर रामचंद्र जायभाये यांनी दिली.
ग्राहकांनी केवळ त्यांच्या पार्सलसाठी पाठवायची वस्तू घेऊन आल्यानंतर टपाल विभागाचे कर्मचारी नाममात्र किमतीत पॅकिंग करून देतील. पॅकिंगसाठी टपाल कार्यालयामध्ये छोटे, मध्यम आणि मोठ्या आकाराचे कार्टून बॉक्स, अन्य साहित्य आणि पार्सल पॅकिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>गोपनीयतेचा नवा कायदा लादला जाण्याची शक्यता; प्रल्हाद कचरे यांची टीका
एप्रिलपासून ७ हजार ३३५ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तिन्ही पॅकिंग केंद्रांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पण, या सेवेबद्दल नागरिकांना फारशी माहिती नसल्याचे जायभाये यांनी सांगितले.
२४ तास सेवा
पुणे रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक एक जवळच्या टपाल कार्यालयाच्या खिडकीवर स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्टबरोबरच पार्सल बुकिंगची २४ तास सुविधाही या महिन्यापासून सुरू झाली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात या केंद्रावर ५३ हजार ६६७ ग्राहकांनी स्पीड पोस्ट, २२ ग्राहकांनी पार्सल आणि ५३ हजार ७०३ ग्राहकांनी रजिस्टर पोस्ट सेवांचा लाभ घेतला आहे. टपाल खात्याकडून पार्सल बुकिंग झाल्यापासून ते योग्य स्थळी वितरित होईपर्यंत प्रत्येक पातळीवर एसएमएस पाठवला जातो. त्याचबरोबर पाठवलेल्या पार्सलचे ट्रॅकिंग इंटरनेटवर आणि पोस्ट ऑफिस इन्फो या पोस्टाच्या मोबाईल ॲपवरही करता येते, असे रामचंद्र जायभाये यांनी सांगितले.