संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून पाच रुपयांचे सर्वागसुंदर टपाल प्रकाशित केले आहे. संमेलनाला अवघे तीन दिवस उरले असताना महत्त्वाची राष्ट्रीय घटना म्हणून संमेलनाच्या बोधचिन्हासह रंगीत तिकीट उपलब्ध करून दिले आहे.
‘नाचू कीर्तनाचे रंगी’ म्हणत हाती एकतारी आणि चिपळ्या घेतलेली संत नामदेवांची तल्लीन मुद्रा, खुला ग्रंथ आणि मोरपिसाची लेखणी, असे या संमेलनाचे बोधचिन्ह असलेल्या तिकिटावर पिवळ्या रंगातील लिलीची फुले असल्यामुळे या तिकिटाचे सौंदर्य खुलले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा हा योग प्रथमच येत असल्याने साहित्यिकांसह मराठी माणसांना अभिमान वाटावी, अशी गोष्ट असल्यामुळे या टपाल तिकिटाविषयी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सर्वानी आनंद व्यक्त केला जात आहे. या टपाल तिकिटाचे घुमान येथील संमेलनातच उद्घाटन होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयामध्ये नोंदणी केल्यानंतर दहा दिवसांनी हे टपाल तिकीट उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे विभागाचे वरिष्ठ डाकपाल एच. जे. काकडे आणि डॉ. शैलेश गुजर यांनी या टपाल तिकिटासाठी पुढाकार घेतला आहे.
याविषयी माहिती देताना काकडे म्हणाले,की भारतीय टपाल विभागातर्फे ‘माय स्टँप’ योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत अशा स्वरूपाचे तिकीट छापून दिले जाते. घुमान येथील संमेलनात या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. भारत देसडला यांनी मंगळवारी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर प्रधान डाकघर येथे तातडीने सुरूवातीची ३६ तिकिटे छापून झाली. या संमेलनाची आठवण म्हणून साहित्य रसिकांना आपल्या संग्रही ठेवण्यासाठी तिकिटे छापून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Story img Loader