फेसबुक आणि स्मार्टफोनच्या जमान्यात कोणत्याही सणाच्या शुभेच्छाही आता स्मार्ट पद्धतीनेच दिल्या जात असल्या तरी दिवाळीची खास शुभेच्छापत्रे पाठविण्याची गंमत काही वेगळीच. टपालाने पाठविलेली शुभेच्छापत्रे तुमच्या मित्रमंडळींना वेळेवर पोहोचावीत यासाठी आता टपाल खात्याकडून ही विशेष तयारी करण्यात आली आहे. दिवाळी निमित्त पाठवली जाणारी शुभेच्छापत्रे वेळेवर आपल्या मित्र-मंडळींपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे टपाल कार्यालयाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातल्या प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये शुभेच्छा पत्रे स्वीकारून ती वेळेत पुढे पाठवता यावीत यासाठीची तयारीही करण्यात आली आहे.

पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच सिटी पोस्ट, खडकी, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, येरवडा, गणेशखिंड, पर्वती, हडपसर, मॉडेल कॉलनी, एस. पी. कॉलेज या टपाल कार्यालयांमध्ये शुभेच्छापत्रे स्वीकारली जाणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड मधील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव टपाल कार्यालयांमध्येही शुभेच्छा पत्रे स्वीकारली जाणार आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र अशा वर्गवारी प्रमाणे शुभेच्छापत्रे टपाल कार्यालयात द्यावीत, असे आवाहन टपाल खात्याकडून करण्यात आले आहे.

शुभेच्छापत्रांच्या पाकिटांवर दिवाळी शुभेच्छापत्रे असा उल्लेख करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शुभेच्छा पत्रे पाठवताना त्यावर अचूक पिन कोड लिहावेत, तसेच नोटा, नाणी अशा प्रकारचे चलन पाठवू नये अशी सूचनाही देण्यात आली आहे.