सण, जयंती असो की वाढदिवस, कोणत्याही निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये सगळीकडे फलकबाजी करून मिरवणाऱ्या ‘पोस्टर बॉइज’चा सुळसुळाट झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या स्वयंघोषित दावेदारांनी त्यात आणखी भर घातली आहे. बेकायदेशीर फलक आणि पोस्टर विरुद्ध कारवाई करू, अशा कितीही घोषणा महापालिका प्रशासनाकडून होत असल्या तरी त्या हवेतच आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या प्रमुख चौकांमध्ये, उड्डाणपुलांलगतचा परिसर, अंतर्गत रस्ते, गल्ली-बोळांमध्ये सगळीकडे ‘पोस्टर’ झळकवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. कोणताही उत्सव असो, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टरबाजी ठरलेली आहे. राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे निमित्त साधले जाते, चौकाचौकांमध्ये स्वत: झळकून घेण्याची हौस अनेक जण भागवताना दिसतात. महामार्गावर दापोडी, नाशिक फाटा, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या चौकांसह प्रमुख चौकांमध्ये ‘पोस्टरयुद्ध’ नेहमीचेच आहे. सध्या ईदच्या शुभेच्छांचे फलक लागलेले आहेत. नागपंचमी, क्रांतिदिन, स्वातंत्र्यदिन, राखी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणपती असा क्रम लागूनच आहे. त्यामुळे या कालावधीत पुन्हा झळकण्याची संधी ‘पोस्टर बॉइज’ सोडणार नाहीत. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. रिक्षांच्या हुडवर, भिंती, पानटपऱ्यांवर झळकून झाल्यानंतर हे स्वयंघोषित आमदारकीचे उमेदवार पोस्टरयुद्धात उतरण्याची चिन्हे आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात राजकीय पक्षांची चढाओढ आहे. एका अपक्ष नगरसेवकाने चिंचवड परिसरात कहर केला आहे. आता निवडणुकांच्या दिशेने हळूहळू ही राजकीय स्पर्धा वाढतच जाणार आहे. ही वाढती पोस्टरबाजी महापालिकेच्या दृष्टीने डोकेदुखी ठरते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक भाषणात सांगतात, शहर विद्रूप करू नका. मात्र, पोस्टरबाजीत त्यांच्याच राष्ट्रवादीचे पुढारी आघाडीवर आहेत. त्यामुळे प्रशासन हतबल असून पोस्टर बॉइजचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा