पुणे: ‘उद्धवचा वाटा,महाराष्ट्राचा घाटा’ अशा आशयाचे फलक लावत प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरे समर्थकांनी पोस्टरद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. ‘राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांमध्ये मिळत नव्हता वाटा म्हणूनच गद्दारांनीच केलाय राज्यातील तरूणांचा घाटा’ अशा आशयाचा फलक ठाकरे समर्थकांनी शुक्रवार पेठेत लावला आहे. यानिमित्ताने शिंदे-ठाकरे गटात पोस्टर वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>> पुणे: सैनिक शाळा प्रवेश परीक्षा ८ जानेवारीला; अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
वेदान्ता फॉक्सकॉन आणि टाटा-एअर बस प्रकल्प बाहेर गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कोणत्या सरकारमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेले यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी देत बाळासाहेबांची शिवसेनेने शहराच्या विविध भागात फलक लावत ठाकरे यांना लक्ष्य केले होते. ‘उद्धवचा वाटा,महाराष्ट्राचा घाटा’अशा आशयाचे फलक शिंदे गटाने फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता येथे लावले होते. त्याला उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरात गद्दारांमुळेच राज्याला तोटा झाल्याचा आरोप फलकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील समर्थकांध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फलकबाजी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.