खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दिलेली बहात्तर तासांची मुदत संपली असली, तरी खड्डे दुरुस्त होण्याऐवजी शहरातील खड्डे वाढतच असल्याची वस्तुस्थिती पुणेकर रोज अनुभवत आहेत.
शहरात सर्व लहान-मोठय़ा रस्त्यांना खड्डे पडल्यानंतर महापौर वैशाली बनकर आणि खासदार वंदना चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत चर्चा केली होती. गेल्या शुक्रवारी सकाळी ही बैठक झाली होती. येत्या बहात्तर तासात शहरातील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन त्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात खड्डे दुरुस्त होण्याऐवजी सर्व रस्त्यांना नव्याने खड्डे पडत असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी ‘खड्डे पेटवा’ आंदोलन करण्यात आले. मनसेचे महापालिकेतील गटनेता वसंत मोरे, नगरसेविका रुपाली पाटील, मनविसेचे अध्यक्ष आशिष साबळे, तसेच सचिन काटकर, रणजित ढगे, अभिषेक थिटे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरभर पडलेले खड्डे आणि महापालिका प्रशासनाची अकार्यक्षमता याबाबत पुणेकरांच्या भावना ज्वलंत असून त्याचे प्रतीक म्हणूनच खड्डे पेटवा आंदोलन केल्याचे मोरे यांनी या वेळी सांगितले. शिवाजी रस्त्यासह अनेक रस्त्यांवर रोज तेच तेच खड्डे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. तसेच दुरुस्ती म्हणजे फक्त खड्डय़ांमध्ये खडीचा चुरा टाकण्याचे काम केले जात असून हा चुरा पाऊस पडताच बाहेर येत आहे. अशाप्रकारे कामे केली जात असल्यामुळे सर्व रस्त्यांवरील खड्डे आहेत तसेच आहेत, असेही मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

Story img Loader