पुणे : शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यातच हे खड्डे भर पावसात बुजविल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांत अनेक जणांना गंभीर दुखापत होत आहे. अशा रुग्णांची संख्या आठवडाभरात २० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले. या खड्ड्यांत दुचाकी आदळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रामुख्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहे. त्यामुळे अनेकांना हाड मोडणे, मणक्याला दुखापत अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाऊस सुरू असताना खड्डे बुजविण्याची मलमपट्टी करण्यात आल्याने आता ते पुन्हा उखडले आहेत. त्यातील खडी रस्त्यावर पसरून दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे.
आणखी वाचा-पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा; खर्च किती कोटींवर?
याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के म्हणाले, की रस्त्यावर दुचाकी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने हाडांशी निगडित तक्रारी या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. कंबरदुखी आणि पाठदुखी असा त्रास या रुग्णांना होत आहे. अपघातात गुडघे आणि खांद्याला दुखापत होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. अनेक वेळा गंभीर दुखापत असल्याने शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहत नाही. खड्ड्यांमध्ये बस आदळून मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याच्याही काही घटना घडल्या आहेत.
या विषयी अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद मोडक म्हणाले, की रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून हाडे मोडणे, अस्थिबंध फाटणे असे प्रकार वाढले आहेत. याच वेळी मानदुखी, कंबरदुखी असा त्रास वाहनचालकांना होत आहे. रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने गुडघ्याला गंभीर इजा होण्याचे प्रमाण अधिक आहे. या आठवड्यात असे ५ ते ६ रुग्ण दाखल झाले आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खोलीचा अंदाज न आल्यानेही दुचाकी अपघात घडत आहेत. अशा प्रकरणांमध्ये कंबर आणि मणक्याला दणका बसल्याने गंभीर इजा होत आहे.
आणखी वाचा-कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी तडजोडीने जागा घेण्यास प्राधान्य
काळजी काय घ्यावी?
- खराब रस्त्यांवरून जाताना वाहनाचा वेग कमी ठेवा.
- रस्त्यावरील खड्ड्यांतून वाहन सावधगिरीने चालवा.
- गंभीर दुखापत टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे.
- रस्ते निसरडे झाल्याने वाहन चालविताना काळजी घ्यावी.
शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. रस्त्यावरील खड्डे वेळच्या वेळी बुजवायला हवेत. बांधकामाच्या ठिकाणची रेती आणि वाळू रस्त्यावर पसरत असून, ते टाळायला हवे. रस्ते चांगले असतील तर हे अपघात टाळता येतील. -डॉ. मिलिंद मोडक, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ