संपूर्ण शहरातील रस्ते उखडल्याचा आणि रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याचा प्रश्न सोमवारी महापालिकेच्या सभेत चांगलाच गाजला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच सर्वत्र खड्डे पडल्याचाही आरोप सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आणि पुण्याला खड्डय़ांमधून तातडीने बाहेर काढा, अशी आग्रही मागणी देखील सभेत करण्यात आली.
महापालिकेची सभा सुरू होताच अनेक नगरसेववकांनी खड्डय़ांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी हात वर करून महापौरांचे लक्ष वेधले. दिलीप बराटे यांनी चर्चेला प्रारंभ केला आणि शहरातील खड्डय़ांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरभर खड्डे पडले आहेत आणि अधिकाऱ्यांना फोन केला की क्षेत्रीय कार्यालयात कळवा, मुख्य भवनात कळवा, पथ विभागात कळवा अशी उत्तरे दिली जात आहेत. तुम्ही आमचा नगरसेवकांचा काय फुटबॉल करायचे ठरवले आहे का, अशी विचारणा या वेळी शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी केली. मे, जून महिन्यात केलेले रस्तेही धड राहिलेले नाहीत. जाल तेथे खड्डे आहेत. केलेल्या कामांची गुणवत्ता कोण तपासते, असा प्रश्न विचारून या खड्डय़ांमधून पुण्याला बाहेर काढा, अशी मागणी दत्ता धनकवडे यांनी केली.
केबल तसेच गॅस वाहिन्या टाकण्यासाठी कंपन्यांकडून पालिका लाखो रुपये भरून घेते; पण केबल टाकण्याचे काम झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती मात्र केली जात नाही अशी तक्रार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी या वेळी केली. ही कामे करण्याची निविदा १ जून रोजी काढण्यात आली आहे. प्रशासन आठ-आठ महिने काय करते अशीही विचारणा त्यांनी केली. रस्त्यांची कामे करताना सल्लागारांना कोटय़वधी रुपये दिले जातात. तरीही खड्डे कसे पडतात असा प्रश्न उपस्थित करून अश्विनी कदम यांनी महापालिकेकडून या कामांपोटी फक्त पैसे वाटले जातात, अशी टीका केली.
किती वर्षे चर्चाच करणार ?
सभेत अस्मिता शिंदे यांनी केलेले छोटे भाषण चांगलेच प्रभावी ठरले. प्रत्येक पावसाळा आला, की खड्डय़ांवर होणारी ही चर्चा आणखी किती वर्षे आपण करणार, या चर्चेनंतर प्रशासन काहीही कृती करत नाही. चर्चेनुसार प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार असा प्रश्न शिंदे यांनी या वेळी विचारला. जे रस्ते दोनतीन वर्षांपूर्वी केलेले आहेत आणि जे आज उखडले आहेत, त्यांची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यांकडे, कोणत्या ठेकेदारांकडे आणि कोणत्या सल्लागारांकडे होती ते निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सभागृहनेता सुभाष जगताप यांनी या वेळी केली.
खड्डे पडलेले प्रमुख रस्ते
सातारा रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, डेक्कन परिसर, स्वारगेट, धनकवडी, कात्रज परिसर, मित्रमंडळ परिसर, शिवदर्शन परिसर, पर्वती परिसर म्हात्रे पूल, हडपसर, मगरपट्टा.                                                                                                     पाऊस उघडल्याशिवाय खड्डे दुरुस्त होणे अवघड
संपूर्ण शहरातील रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याची वस्तुस्थिती असली, तरी पाऊस उघडल्याशिवाय खड्डय़ांची दुरुस्ती अवघड असल्याचे सोमवारी महापालिका सभेत स्पष्ट झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरभर खड्डे पडल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्याशिवाय खड्डे दुरुस्त करता येणार नाहीत आणि पावसात काम केले, तर ते वाया जाईल, असे आयुक्त महेश पाठक यांनी सभेत सांगितले.
सभा सुरू होताच दिलीप बराटे यांनी खड्डय़ांचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर अठ्ठावीस नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या भागातील खड्डय़ांबाबत तक्रारी करत या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेवकांनी धारेवर धरल्यानंतर पथ विभागाचे प्रमुख प्रमोद निर्भवणे यांनी या विषयावर निवेदन केले. मात्र, खड्डय़ांवरील उपाययोजना सांगण्याऐवजी तसेच खड्डय़ांना जे कारणीभूत ठरले त्यांच्यावर काय कारवाई करणार, या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीच ते पुन्हा सभेला सांगू लागले. त्यांच्या या निवेदनाला सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. उपाययोजना सांगण्याऐवजी सर्वत्र खड्डे पडले आहेत हेच काय तुम्ही आम्हाला सांगताय, असा प्रश्न सदस्यांनी त्यांना विचारला. रस्ते दुरुस्तीसाठी लाखो रुपये तुम्ही सल्लागारांना देता. त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार ते सांगा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
अखेर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सदस्यांनी आयुक्तांना निवेदन करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर आयुक्त पाठक यांनी या प्रश्नाबद्दल निवेदन केले. ते म्हणाले, की  गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही १५ मे ते १५ जून या काळात खड्डे दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन केले होते. गेल्यावर्षी या काळात दुरुस्ती केल्यामुळे खड्डय़ांच्या तक्रारी कमी आल्या होत्या. तसेच पाऊसही उशिरा सुरू झाला होता. त्यामुळे दुरुस्तीला अवधी मिळाला होता. यंदा मात्र ४ जून रोजीच पहिला पाऊस सुरू झाला. त्यामुळे यंदा दुरुस्तीचे काम करू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे.
खड्डे दुरुस्त करायचे असतील, तर त्यासाठी पावसाची थोडी उघडीप आवश्यक आहे. पाऊस सुरू असताना दुरुस्तीचे काम केले, तर ते काम वाया जाईल. खड्डे दुरुस्तीबाबत नागरिकांनी कळवल्यानंतर दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्याही अनेक तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत, असेही आयुक्त म्हणाले.