अंडय़ाचा उत्पादन खर्च ४.५० पैसे; विक्री ३.४० पैसे

दत्ता जाधव

पुणे : राज्यातील कुक्कुटपालन उद्योगाला मागील दोन वर्षांपासून खाद्याच्या दरवाढीचा फटका बसत आहे.  पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.  प्रती अंडय़ामागे सव्वा रुपये तोटा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या खाद्यासाठी मका, सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी, शिंपले आणि काही औषधांसह व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा वापर केला जातो. हे खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रति किलो २८ रुपयांपर्यंत खर्च येत आहे.

मागील काही दिवसांपासून प्रति किलो खर्चात दहा रुपयांची वाढ झाली आहे.  या पूर्वी खाद्याचा खर्च उत्पादनाच्या ८० टक्क्यांवर जात होता,तो आता १२० टक्क्यांवर गेला आहे. एका अंडय़ाचा उत्पादन खर्च ४ रुपये ५० पैसे आहे, तर विक्री ३ रुपये ४० पैशांनी होते आहे. प्रति अंडय़ामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. बँकांच्या कर्जाचे हप्ते थांबले आहेत. मार्चअखेरमुळे शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा सुरू आहे. ही खाद्य दरवाढ परवडत नसल्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे गहू, तांदूळ आणि मका अनुदानावर देण्याची मागणी केली आहे. कुक्कुटपालन उद्योगावर राज्यातील सुमारे दहा हजार कुटुंबे अवलंबून आहेत. राज्यात रोज सुमारे एक कोटी अंडी उत्पादन होते. जागतिक अंडी उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील पोल्ट्री उद्योगाची उलाढाल २०२० मध्ये दोन लाख कोटींवर पोहोचली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योगाचा वेगाने विकास होत आहे.

कोंबडय़ांना खाद्य तयार करण्यासाठी मका २५ रुपये, सोयापेंड ६६ रुपये, शेंगपेंड ५२ रुपये, तांदूळ भुस्सा २० रुपये, मासळी ४० रुपये आणि शिंपले ६० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यात पुन्हा औषधे, जीवनसत्त्वे आणि पोषक क्षारयुक्त अन्नाचा समावेश करावा लागतो. एकूण खाद्याच्या दरात ६०-७० टक्के वाढ झाली आहे. व्यवसाय तोटय़ात सुरू आहे. दहा हजार पक्ष्यांमागे रोज २० हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अंडय़ाचा विक्री दर वाढवावा अन्यथा अनुदान तरी द्यावे, तरच हा व्यवसाय टिकेल.

– शत्रुघ्न जाधव, अध्यक्ष, सांगली जिल्हा पोल्ट्री असोसिएशन