पुणे : सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या वारंवार तोडल्या जात असल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वारजे परिसरातील विविध भागात खंडित वीजपुरवठ्याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणचेही आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान महावितरणने यासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाला लेखी पत्र दिल्यानंतर वारजे येथील खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणाची नुकतीच संयुक्त पाहणी झाली. यापुढे खोदकामात वीजवाहिन्यांची कोणतीही क्षती होणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च महावितरणला देण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला महापालिकेकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुण्यात कोयता गँगचा म्होरक्या गजाआड; झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी, कोयते, तलवार जप्त
सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे वारजे परिसरात खोदकाम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदकाम सुरू केले. यामध्ये १ ते ८ मार्च दरम्यान वारजे पूल, खानवस्ती, वारजे वाहतूक पोलीस चौकी, रामनगर तसेच वारजे पाणीपुरवठा याठिकाणी २२ केव्हीच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या होत्या. परिणामी पुणे मेट्रो, डहाणूकर कॉलनी, प्रथमेश सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, डुक्करखिंड परिसर, खानवस्ती, हिंदुस्थान बेकरी, रामनगर परिसरातील काही भागात ३ ते ४ हजार वीजग्राहकांना सरासरी एक ते दोन तासांपर्यंत खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. तर उर्वरित ठिकाणी महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुवरठा सुरळीत ठेवण्यात आला होता. खोदकामात जेसीबीने भूमिगत वीजवाहिन्या तोडल्यानंतर त्याची जबाबदारी घेण्यास कंत्राटदाराने नकार दिल्यानंतर महावितरणकडून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ लेखी स्वरूपात कळविण्यात आले. तसेच वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. यानंतर महावितरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोदकामाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी केली.