औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोऱ्याची उभारणी आणि दुरुस्तीचे पूर्वनियोजित काम रविवारी (४ डिसेंबर) सकाळी ६ ते ८ या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन तासांत शिवाजीनगर परिसर आणि डेक्क्नमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापारेषण कंपनीच्या गणेशखिंड ते चिंचवड तसेच गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्चदाब १३२ केव्ही वीजवाहिन्यांचे मनोरे आणि तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी नवीन मोनोपोल टॉवर उभारण्याचे आणि इतर पहिल्या टप्प्यातील कामे गुरुवारी (१ डिसेंबर) पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित काम रविवारी सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजसेवेवर परिणाम होणार आहे.
हेही वाचा- पिंपरीः लग्न जमविण्यासाठी विधी करण्याच्या नावाखाली महिलेची १२ लाखांची फसवणूक
फर्ग्युसन रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग १, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफीस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पीटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी आदी परिसरात दोन तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. या वेळेत सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.