पुणे : वीजनिर्मितीपासून सर्वसामान्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यापर्यंत असलेल्या अवाढव्य यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘लाइनमन’. या प्रकाशदूताच्या सन्मानाचा आज दिवस. ग्राहकांच्या तक्रारी आणि विजेशी संबंधित अहोरात्र कामे करताना लाइमन हादेखील माणूसच असतो, हे सर्वांनी समजून घ्यावे, अशा भावना त्यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र शासनाने ‘४ मार्च’ हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात साजरा करण्याचे ठरवले आहे. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरातील महावितरणच्या वीजपुरवठ्याचा भार केवळ ३०७५ लाइनमन सांभाळतात. या लाइनमनशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आमच्याकडे ग्राहकांनी माणूस म्हणून बघावे, अशी भावना व्यक्त केली.

‘वीज ग्राहकाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असून शेवटी, लाइनमन हा माणूसच आहे, हे वीजग्राहकांनीही समजून घ्यायला हवे,’ अशी भावना महावितरणच्या रास्ता पेठ विभागातील लाइनमन ईश्वर वाबळे यांनी व्यक्त केली.

वाबळे म्हणाले, ‘लाइनमनला उन, वारा, पाऊस अशा कोणत्याही नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. थेट विजेशी संबंध येत असतो. थोडीशी चूक जिवावर बेतू शकते. शहरात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. शहरात विविध विकास प्रकल्पांची कामेही चालू आहेत. मात्र, लाइनमनची संख्या कमी आहे.’

‘आमच्या कामात चूक करून चालत नाही. लाइनमनला घर, कुटुंब आणि वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून एकाग्रतेने काम करावे लागते. कोणत्याही वेळी कामासाठी तयार राहावे लागते. वीज बिल वसुलीपासून तांत्रिक समस्या सोडवण्यापर्यंत ग्राहक आणि आमचा थेट संपर्क होतो. ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून सहकार्य करावे,’ असे आवाहन लाइनमन विजय जोशी यांनी या वेळी केले.

महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह थकीत वीजबिलांची वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी कामे करावी लागतात. महावितरणच्या ग्राहकसंख्येत दर वर्षी सुमारे १० लाखांची भर पडत आहे. विजेची मागणीही सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे. अशा स्थितीमध्ये ग्राहकांसाठी धडपडणारे हे प्रकाशदूत खऱ्या अर्थाने महावितरणचा कणा आहेत. – निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण