पुणे : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून एका महिन्यात ५१ हजार ७३५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महसुलाचा आर्थिक स्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच असून थकबाकीचा भरणा होत नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरु आहे. यामध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरोधातही भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही महवितरणकडून कळविण्यात आले.

पुणे जिल्ह्यात १९९ कोटी ९९ लाख रुपये, सातारा जिल्ह्यात २० कोटी ४० लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यात ४४ कोटी ७ लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात २० कोटी ८० लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४२ हजार ७३ थकबाकीदारांसह सातारा जिल्ह्यातील १९२०, सोलापूर जिल्ह्यातील ४२७९, कोल्हापूर जिल्ह्यातील १४९० आणि सांगली जिल्ह्यातील १९७३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महावितरणकडून थकबाकी वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करणे यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी ‘ऑन फिल्ड’ असून प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंते राजेंद्र पवार, स्वप्नील काटकर, धर्मराज पेठकर उपविभाग आणि कार्यालयांना भेटी देत आहेत. वीजबिल थकीत असेल तर नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

थकबाकी भरण्याची सुविधा

वीजबिल थकीत असेल तर नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा ऑनलाइन पद्धतीने भरणा करण्यासाठी महावितरणतर्फे http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महावितरणच्या मोबाइल ॲपवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारेही वीजबिल भरण्याची सोय आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी लवकरात लवकर थकबाकीसह वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.