पुणे शहर व विभागामध्ये मोठमोठय़ा वीजचोरांना झटका देण्याची मोहीम महावितरण कंपनीने सुरू केल्यापासून अवघ्या दोनच महिन्यांमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत. इतक्या कमी कालावधीत मोठय़ा रकमेच्या वीजचोऱ्या उघड होण्याचा हा विक्रमच समजला जात आहे. या धडक मोहिमेमध्ये अनेक दिवस वीजयंत्रणेला गंडविणारे बडे वीजग्राहक सापडले असून, त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीची वीजचोरांविरुद्धची मोहीम सामान्य ग्राहकांच्या पुढे जात नसल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात येत होत्या. मात्र, दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये पकडण्यात आलेले वीजचोर पाहता महावितरण कंपनीने बडय़ा वीजचोरांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराम मुंडे यांनी परिमंडलाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागातील बडय़ा वीजग्राहकांचा व त्यांच्या वीजवापराचा सुमारे दीड ते दोन महिने अभ्यास करण्यात आला. काही ठराविक ग्राहकांचा पूर्वीचा वीजवापर व गेल्या काही महिन्यातील वीजवापर तपासण्यात आला. या ग्राहकांवर लक्ष ठेवण्यात आले. त्यातून काहींवर संशय निर्माण झाला. त्यामुळे संबंधितांच्या वीजयंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्यातून हे बडे वीडचोर हाती लागले.
वीजचोरांविरुद्धच्या या मोहिमेमध्ये वेगवेगळ्या कंपन्या, बर्फ तयार करणारे कारखानदार त्याचप्रमाणे कॉल सेंटरही सापडले. प्रामुख्याने रिमोटच्या साहाय्याने होणारी वीजचोरी या मोहिमेतून पुढे आली. वीजयंत्रणेमध्ये रिमोटचे सर्किट बसवून हव्या त्या वेळेला वीजमीटरचे रििडग थांबविण्याचा उद्योग या कारखानदारांकडून करण्यात येत होता. त्यातून प्रत्येकी १५ ते ३० लाख रुपयांच्या वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. रिमोटच्या वापराचा हा प्रकार प्रथमच पुण्यात मोठय़ा प्रमाणावर आढळून आला. मीटरच्या यंत्रणेमध्ये फेरफार करून रिडिंग थांबविण्याचे प्रकारही आढळून आले.
सोसायटय़ांमध्ये होणारी वीजचोरीही या मोहिमेच्या माध्यमातून उघड झाली. कोणतेही मीटर किंवा अधिकृत वीजजोड नसताना सदनिकांसाठी वीज वापरली जात असल्याचा प्रकार उघड झाला. केवळ दोनच महिन्यामध्ये पकडलेल्या वीजचोरीचा आकडा आता तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यातील ९० टक्के वीजचोरी ही कारखानदार व वाणिज्यिक वीजग्राहकांची आहे. त्यामुळे या वीजचोरांनी यापूर्वीही वीजयंत्रणेला गंडा घातला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वीजचोर पकडले गेले नसते, तर ही वीजचोरी कायम राहून त्याचा भार अप्रत्यक्षपणे सामान्य ग्राहकांनाच सोसावा लागला असता. महावितरण कंपनीकडून ही मोहीम अशीच पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याने आणखी मोठमोठे वीजचोर गळाला लागण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा