Maharashtra MSEB Employee Strike : राज्यातील वीज कर्मचारी खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून ७२ तासाच्या आंदोलनावर ठाम आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक महावितरण कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात येत असून, पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर हजारो वीज कर्मचारी एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे.
‘गो बॅक अदानी’च्या कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तर या आंदोलनामुळे पुणे शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसल्याचे पाहावयास मिळत आहे.
सिंहगड परिसरातील धायरी, आनंदनगर, सनसिटी परिसरात पहाटे साडेतीनपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच कात्रज, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, कसबा पेठ परिसरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आंदोलनाबाबत संघटनेचे पदाधिकारी भीमाशंकर पोहेकर म्हणाले की, आमचा खासगीकरणाला विरोध असल्याने आंदोलनाचा अस्त्र उगारला. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा आम्ही 18 तारखेपासून बेमुदत आंदोलन करणार, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.