पुणे : चित्रपटाच्या सुरुवातीला तुतारी वाजवणारी स्त्री, असे दृश्य प्रभात चित्रने निर्मिती केलेल्या चित्रपटांची महत्त्वपूर्ण ओळख… प्रभातच्या या तुतारीच्या धूनवर आणि बोधचिन्हावर आता व्यापारचिन्हाची (ट्रेडमार्क) मोहोर उमटली असून, सात वर्षे प्रयत्न केल्यानंतर धून आणि बोधचिन्ह आता नोंदणीकृत झाले आहे.
प्रभातने निर्मिती केलेल्या चित्रपटांसह प्रभातच्या बोधचिन्हाचे हक्क विष्णुपंत दामले यांच्या वारसदारांकडे आहेत. मात्र प्रभातची ओळख असलेल्या तुतारीची धून आतापर्यंत नोंदणीकृत नव्हती. त्यामुळे दामले कुटुंबीयांनी २०१४मध्ये तुतारीची धून नोंदणीकृत करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर गेल्या सात वर्षांत बरीच स्पष्टीकरणे आणि कागदपत्रे व्यापारचिन्ह कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यामुळे २९ ऑक्टोबरला तुतारीची धून नोंदणीकृत झाल्याचे प्रमाणपत्र व्यापारचिन्ह कार्यालयाकडून देण्यात आले. संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि संगीतकार र्मिंलद इंगळे यांनी तुतारीच्या धूनचे सांगीतिक नोटेशन्स तयार करण्यासाठी सहकार्य केले. प्रभातचे संस्थापक विष्णुपंत दामले यांचे नातू अनिल दामले यांनी याविषयी माहिती दिली.
प्रभात स्टुडिओच्या स्थापनेनंतर मूकपटाच्या काळात बोधचिन्ह म्हणून तुतारी वाजवणारी स्त्री एवढेच दृश्य दिसे. गुलाबबाई यांच्यावर ते चित्रित करण्यात आले होते. मात्र ध्वनीची सुविधा विकसित झाल्यावर १९३२मध्ये शांताबाई देशमुख यांच्यावर ते दृश्य नव्याने चित्रित करण्यात आले. प्रभात फिल्म कंपनी बंद झाल्यावर प्रभातचे बोधचिन्ह रामभाऊ गबाले यांनी घेतले होते. त्यांना या बोधचिन्हाचा वापर करून चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा होती. पण काही कारणाने त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे १९६९मध्ये माझे वडील अनंत दामले यांनी चित्रपटांचे हक्क मिळवले. त्यानंतर प्रभातचे चित्रपट विविध माध्यमांत उपलब्ध झाले. तर १९७९मध्ये रामभाऊ गबाले यांनी बोधचिन्हाचे हक्कही पुन्हा विकत घेतले. आतापर्यंत बोधचिन्ह आणि तुतारीची धून नोंदणीकृत नसल्याने त्याचा गैरवापर होण्याचा धोका होता. आता बोधचिन्ह आणि तुतारीची धून नोंदणीकृत झाल्याने त्याचा गैरवापर करता येणार नाही, असे दामले यांनी सांगितले.
चित्रपटांचे वैशिष्ट्य …
विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम, एस. फत्तेलाल, केशवराव धायबर आणि एस. व्ही कुलकर्णी यांनी प्रभात स्टुडिओची स्थापना केली. प्रभातने निर्मिती केलेल्या चित्रपटांच्या सुरुवातीला बोधचिन्ह म्हणून तुतारी वाजवणारी स्त्री दिसायची. प्रभातच्या चित्रपटांचे ते वैशिष्ट्यच ठरले होते. बोलपट आल्यानंतर या दृश्यासह ‘देसकार’ रागात वाजविलेली क्लॅरोनेट वाद्यावरील धून वाजे.
थोडा इतिहास…
१९२९मध्ये स्टुडिओची स्थापना झाल्यावर प्रभातचे बोधचिन्ह काय असावे याचा विचार करण्यात आला. बराच विचार विमर्श केल्यानंतर ‘तुतारी वाजवणारी स्त्री’ हे बोधचिन्ह तयार झाले. रर्णंशग असलेले तुतारी हे वाद्य स्त्रीच्या हाती असा काळाच्या पुढचा विचार त्या वेळी करण्यात आला होता.
महत्त्व का? व्यापारचिन्ह म्हणून एखादी धून पहिल्यांदाच नोंदणीकृत झाली आहे. नोंदणी झाल्यामुळे या धूनचा गैरवापर केला जाऊ शकत नाही. तसेच त्या धूनचे हक्क अबाधित राहतील.