मराठी चित्रपटसृष्टीचा गौरवास्पद इतिहास ‘प्रभात’ या एकाच शब्दांत एकवटला आहे. ती जाणीव ठेवून आणि भारतीय चित्रपटांच्या शताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘प्रभात परिवारा’ने यावर्षीपासून मराठी चित्रपटांच्या कलागुणांच्या सन्मानासाठी दरवर्षी ‘प्रभात पुरस्कार’ देण्याचे निश्चित केले आहे.
केवळ मराठीतच नव्हे तर, भारतीय चित्रपटांच्या सुवर्णयुगाचे पर्व मानले गेलेल्या प्रभातने सर्वसामान्यांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान तर मिळवलेच; पण आपल्या चित्रकृती आंतरराष्ट्रीय कीर्तीलाही पोहोचवल्या. समृद्ध आशय आणि संपन्न तंत्रानिशी थेट मनाला भिडणारे प्रभातचे चित्रपट अजरामर ठरले. सध्या मराठी चित्रपट ज्या बांधीलकीने आणि दर्जाने बनत आहेत त्याचे प्रभातशी एक नाते आहे. मराठी चित्रसृष्टी ज्या उत्कर्षांप्रत पोहोचावी असे प्रभातचे स्वप्न होते त्याच स्वप्नाचा ध्यास आजच्या पिढीलाही असल्याचे प्रत्ययास येत आहे. या कृतज्ञ भावनेतून मराठी चित्रपटांच्या दुसऱ्या सुवर्णयुगाचे प्रभातने पुरस्काराच्या माध्यमातून स्वागत करण्याचे ठरविले आहे. प्रभातच्या लौकिकाला साजेशा निष्ठेने हे पुरस्कार दिले जावेत, ही जबाबदारी मोठी असून त्यासाठी सुमनताई किलरेस्कर, प्रतापराव पवार, श्रीनिवास पाटील आणि डॉ. जब्बार पटेल यांचे पालकत्व लाभणार आहे. पुरस्काराची विश्वासार्हता आणि दर्जा राखण्यासाठी चित्रपटांचे मूल्यांकन सक्षम परीक्षकांकडे सोपविले जाणार आहे. पुरस्कारांच्या निवडप्रक्रियेत चित्रपट तज्ज्ञांसह जाणकार रसिकांनाही सहभागी करून घेण्याची योजना आहे.
दरवर्षी निर्मिती होणाऱ्या आणि सेन्सॉरसंमत असणाऱ्या मराठी चित्रपटांसाठी हे पुरस्कार असून त्यासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीतील चित्रपटांचा समावेश केला जाणार आहे. सवरेत्कृष्ट चित्रपटांच्या पुरस्कारासह दिग्दर्शन, लेखन, अभिनय, संगीत, छायांकन, संकलन, अनुषंगिक तंत्रांसाठीचे आणि काही वेगळे वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत. या सर्व पुरस्कारांना प्रभात चित्रपटांना ज्यांचे योगदान लाभले होते त्या प्रतिभावंतांची नावे असतील. मराठी चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांशिवाय हिंदी चित्रपटांतील सवरेत्कृष्ट प्रथम पदार्पण हे अभिनेता आणि अभिनेत्री, त्याचप्रमाणे संगीतकार हे तीन विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत. संगीतकार हुस्नलाल-भगतराम, देव आनंद आणि मधुबाला यांच्या कारकिर्दीची सुरुवात प्रभातमधूनच झाली. त्यांचे स्मरण या पुरस्कारांमागे आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलाकारांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या वर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका दाखल करण्याची ९ मार्च ही अंतिम मुदत आहे. प्रभातच्या वर्धापनदिनी म्हणजेच एक जून रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक रजनीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरवर्षी स्पर्धेतील निवडक चित्रपटांचा साप्ताहिक महोत्सव आयोजित केला जाणार आहे. प्रभात चित्रपटगृह येथे १० ते १६ मे या कालावधीत यंदाचा महोत्सव होणार असल्याचे विवेक दामले यांनी कळविले आहे.

Story img Loader