पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली शहरासह जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी गुरुवारी केली.
हेही वाचा >>> भाजपच्या पुणे शहराध्यक्षाचे नाव निश्चित…’यांपैकी’ एकाची होणार निवड
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात गारटकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीनंतर गारटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की या बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, सहकारी संस्था, कारखाने, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, कात्रज दूध संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे या वेळी स्वागत केले. बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रश्न आगामी काळात कसे सोडविता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. जयंत पाटील यांनी मला जिल्हाध्यक्ष पदावरुन हटविल्यानंतर सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी मला पुन्हा या पदावर नियुक्ती करुन काम करण्याची संधी दिल्याबद्दल गारटकर यांनी आभार मानले.
हेही वाचा >>> पुणे: पायाच्या हाडांचा चुरा होऊनही तो पुन्हा उभा राहिला!
बुथ सर्वेक्षण अभियान जिल्हाभर राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या समर्थनार्थ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी १०० रुपयांच्या मुद्रांकावर (स्टॅम्प पेपर) प्रतिज्ञापत्र तातडीने भरुन देण्याविषयी निर्णय झाला असल्याचे गारटकर यांनी सांगितले.
दहा तालुकाध्यक्षांचे समर्थन जिल्ह्यात पहिल्यांदाच अजित पवार गटाची बैठक गारटकर यांनी बोलविली होती. या बैठकीला जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील तालुकाध्यक्षांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी दहा तालुकाध्यक्ष यांनी या बैठकीस उपस्थिती लावत अजित पवार गटाला समर्थन दिले. दौंड, पुरंदर आणि मुळशी या तीन तालुकाध्यक्षांनी या बैठकीला गैरहजर राहिले. यावरून या तीन तालुकाध्यक्षांनी शरद पवार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.