पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ‘डीआरडीओ’चा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्ज, तसेच आवाजाच्या चाचणीवर शुक्रवारी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी झाली. राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) वरिष्ठ अधिकारी सुनावणीस उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने एटीएस अधिकाऱ्यांना फटकारले.

कुरुलकर याच्या जामीन अर्जावर, तसेच आवाजाच्या चाचणीवर   विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (१८ ऑगस्ट) विशेष न्यायालयात सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली होती. सरकार पक्षाचे आणि बचाव पक्षाचे वकील सुनावणीस उपस्थित होते. मात्र, एटीएसचे तपास अधिकारी सुनावणीला उपस्थित नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यानंतर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याची सूचना केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही एटीएसचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. वेळ न पाळल्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले.

यापुढे न्यायालयाने निश्चित केलेल्या सुनावणीस एटीएस अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले.  कुरुलकरला दूरसंवाद प्रणालीद्वारे हजर  शुक्रवारी झालेल्या सुनावणीला कुरुलकर याला येरवडा कारागृहातून दूरसंवाद प्रणालीद्वारे  हजर करण्यात आले. त्यानंतर एटीएसचे अधिकारी सुनावणीस उपस्थित राहिले. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. हृषीकेश गानू यांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विजय फरगडे यांनी कुरुलकरने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पत्नीचा गुन्ह्याशी संबंध नाही’

 कुरुलकर याच्या पत्नीचा या गु्न्ह्याशी संबंध नाही, असे न्यायालयात बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. गानू यांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते. कुरुलकरने न्यायालयात बाजू मांडली. त्या वेळी तुमच्या पत्नीचा मोबाइल संच न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार नसल्याचे अ‍ॅड. गानू यांनी कुरुलकरला सांगितले.