पुणे : “दुर्दैवाने यंदाची दिवाळी अजित पवार यांना एकट्याला साजरी करावी लागेल, असे वाटत आहे. पण पुढील दिवाळी अजित पवार हे कुटुंबासोबत साजरी करतील, अशी अपेक्षा करुया,” असा टोला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
हेही वाचा – पिंपरी : शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे शिंदे गटात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला २ जुलै रोजी पाठिंबा दिल्याच्या घटनेला आज १५ दिवसांचा कालावधी होत आला आहे. या पंधरा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रीपददेखील मिळाले. पण त्याच दरम्यान अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या सर्व घडामोडींदरम्यान काल मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे मागील पंधरा दिवस एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणारे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले.
भेटीबाबत पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, दुर्दैवाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यंदाची दिवाळी एकट्याला साजरी करावी लागेल, असे वाटते आहे. पण पुढील दिवाळी अजित पवार हे कुटुंबासोबत साजरी करतील अशी अपेक्षा करुया.
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काल एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत शेतकरी सर्वांत शेवटी होता. या सरकारच्या रेकॉर्डमध्ये शेतकरी कुठेही दिसत नाही, हे खिसे भरणारे सरकार असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारवर केली.