लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फुले’ चित्रपट आहे तसा प्रदर्शित व्हावा,’ अशी मागणी करून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले वाडा येथे या चित्रपटाच्या समर्थनार्थ शुक्रवारी आंदोलन केले.

चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे गेली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करून, प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले वाडा येथे निदर्शने केली. नंतर आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आंबेडकर म्हणाले, ‘सेन्सॉर बोर्डामध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर काही परिणाम होईल का, याची तपासणी केली जाते. पण, राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. बोर्ड आपला विरोध कायम ठेवणार असेल, तर त्या बोर्डाच्या सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करू. महात्मा फुले यांचे वाङ्मय सरकारनेच प्रसिद्ध केले आहे. चित्रपटातील दृश्ये ही समग्र वाङ्मयावर आधारित आहेत. सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही, तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करू. एकीकडे सरकार अभिवादन करते. तर, दुसरीकडे फुले यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध करते. हा विरोधाभास थांबला पाहिजे. ‘फुले’ चित्रपट आहे तसा प्रदर्शित झाला पाहिजे.’