मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यास हरकत नाही, मात्र या समाजाला ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी इतर मागास वर्गातील समाजात जनजागृती करून व रस्त्यावर उतरून लढा द्यावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केले.
मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून नव्हे, तर स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व ओबीसीच्या विविध संघटनांच्या वतीने संयुक्तपणे ओबीसी आरक्षण बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आंबेडकर बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद वडगावकर, गुरव समाज संघटनेचे अ‍ॅड. अण्णा शिंदे, पुणे जिल्हा ओबीसी सेवा संघाचे मोहन देशमाने, भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे, महासंघाचे शहराध्यक्ष म. ना. कांबळे, संघटक गौतम ललकारे आदी या वेळी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, ओबीसी वर्गासाठी भविष्यात प्रशासकीय सेवेत ३५ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाचा विषय सोडून ओबीसीच्या कोटय़ातून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण ही सरकारची चाल आहे. आरक्षण म्हणजे विकास. त्यामुळे मराठा समाजातील मागास वर्गाच्या विकासासाठी नक्कीच आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र त्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटू नये. आरक्षणाचा हा लढा लढण्यासाठी ओबीसी समाजाने सज्ज झाले पाहिजे. जिल्हा, तालुका पातळ्यांवर जनजागृती करण्याबरोबरच रस्त्यावर उतरून हा लढा लढला पाहिजे.