प्रथमेश गोडबोले
पुणे : एल्गार परिषदेला नक्षलवादी, माओवाद्यांनी निधी पुरविल्याचा पोलिसांचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर केला. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकर यांची गुरुवारी उलटतपासणी घेण्यात आली.
हेही वाचा… रेल्वे प्रवाशांसाठी आकुर्डी स्थानकावर आता लिफ्टची सुविधा
हेही वाचा… कामकाज सोडून अधिकारी रंगले क्रिकेट सामना पाहण्यात! पिंपरी महापालिकेत अजब प्रकार
ॲड. बी. जी. बनसोड, ॲड. किरण चन्ने यांनी आंबेडकर यांची उलटतपासणी घेतली. एल्गार परिषदेला नक्षलवादी, माओवाद्यांनी निधी पुरविल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हा आरोप धादांत खोटा असून आरोप करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची मला उलटतपासणी घेऊ द्यावी, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा आयोगासमोर पाचारण करावे, असे आंबेडकर यांनी आयोगाला सांगितले. शुक्रवारी एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांची उलटतपासणी नियोजित आहे.