कथित लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटातील दाव्यांवरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाठिंबा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या वादावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच या चित्रपटाला दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींना टोलाही लगावला.
हेही वाचा – ‘द केरला स्टोरी’च्या क्रू मेंबरला धमकी, दिग्दर्शकाची मुंबई पोलिसांत धाव
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“मी ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच राजकीय वाद निर्माण केले जात आहेत. त्यासाठीच हे सर्व राजकारण सुरू आहे. खरे तर या चित्रपटातून घेण्यासारखे काहीही नसेल”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आंबेडकरांचा मोदींना टोला
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या पाठिंब्यावरही भाष्य केले. “काही जण ठरवून लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात. प्रेमविवाह करताना जात, धर्म बघितला जात नाही. मात्र, पंतप्रधान मोदींना याबाबतचा अनुभव नसल्याने त्यांना लव्ह जिहाद माहिती नाही”, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा – ‘The Kerala Story’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम, चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
पंतप्रधान मोदींनी दिला होता पाठिंबा
दरमान, कर्नाटकमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला होता. “दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘द केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातले खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे. बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचे दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे,” असे ते म्हणाले होते.