पुणे: कोरेगाव भीमा येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्याच्या अनेक भागातून लाखोंच्या संख्येने नागरिक विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात.यंदा देखील नागरिक मोठ्या संख्येने अभिवादन करण्यास नागरिक आले आहेत.तर यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील अभिवादन केले.त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत,राज्यातील अनेक घडामोडी बाबत भाष्य देखील केले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड ला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे का ? वाल्मिक कराड सीआयडी ऑफिस मध्ये जाऊन हजर होण हे प्री प्लॅन होते अस वाटत का ? त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की,त्या लढ्याला मराठा विरुद्ध वंजारी हा रंग दिला जातोय, त्यामध्ये शासनाने अधिक दक्षता बाळगली पाहिजे होती.तसेच वाल्मिक कराड कुठे लपलेला होता.याबाबत पोलिसांना माहिती नाही.याबद्दल मला आश्चर्य वाटते आणि गुप्तचर यंत्रणांनी आपल अपयश वारंवार जनतेसमोर आणू नये,ही माझी त्यांना विनंती असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,हे सर्व प्री प्लॅन वाटत असून ते सरळ सरळ दिसत आहे.त्यामध्ये नवीन काहीच दिसत नाही.तसेच या प्रकरणी सरकारवर प्रचंड दबाव असून या दबावाला मुख्यमंत्र्यांनी बळी पडू नये,अशी भूमिका त्यांनी मांडली.