पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडविण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा आणि ओबीसींचे आरक्षण वेगवेगळे असावे, अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणासंदर्भातील काही आंदोलने पाहिली असून ती कशी दडपली जातात, हे माहिती आहे. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये, यासाठी त्यांनी निवडणूक लढविली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. मुस्लिम आणि ओबीसी समाजाने ऐक्य ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता परिवर्तन महासभेचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आंबेडकर बोलत होते. शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, प्रकाश शेंडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या एक मतदाराने पाच मतदार जोडावेत, असे राजकीय गणितही आंबेडकर यांनी यावेळी मांडताना भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.
हेही वाचा…पुणे : अरबी भाषेत संवाद साधून आखाती देशातील नागरिकांना लुटणारी दिल्लीतील टोळी गजाआड
ते म्हणाले की, आगामी निवडणूक ही पक्षाची नाही. कोणत्या पक्षाला सत्तेवर बसवायचे याचीही नाही. मात्र अधिकार शाबूत ठेवण्यासाठीची ही निवडणूक आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागेल. उद्याची व्यवस्था काय असेल, याची चुणूक राज्य सरकारने दाखविली आहे. शासकीय कर्मचारी भरती प्रक्रिया न करता कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. वेठबिगार आणण्याची सरकारची भूमिका आहे. सरकारकडून हमी, शाश्वती संपवली जात आहे. नागरिकांचे स्वातंत्र्य बंदिस्त करण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे. त्यासाठी दंगलीही घडविल्या जातील, आरक्षणही कागदावरच ठेवले जाईल.
हेही वाचा…पुणे : दांडेकर पूल, बिंदू माधव ठाकरे चौकात होणार ग्रेड सेपरेटर – उड्डाणपूल
यापूर्वीच्या सत्तेवरील राजकीय पक्षांनी घटनेने दिलेल्या चौकटीबाहेर जाणार नाही, असे बंधन घालून घेतले होते. त्यामुळे नागरिकांचे अधिकार, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले होते. मात्र भाजपला आता बंदिस्त व्यवस्था निर्माण करायची आहे. त्यामुळे त्याविरोधात उभे रहावे लागणार आहे. उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करताना मुस्लिम समाजाला बरोबर घ्यावे लागले. मुस्लिम समाज राजकीय पक्षांमध्ये त्यांची सुरक्षितता शोधत आहे. मात्र त्यांना राजकीय पक्ष सुरक्षा देणार नाहीत. मुस्लिम आणि अन्य उपेक्षितांमधील वाद संपल्यानंतरच त्यांना सुरक्षितता मिळणार आहे. त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी उपेक्षितांची जात धर्म न पहाता एकजूटीने लढावे लागेल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.