पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मंगळवारी (२९ ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही आयोगाने उलटतपासाणीसाठी पाचारण केले आहे. या शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची आयोगासमोर उलटतपासणी पूर्ण झाली आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही घटना घडली तेव्हा नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते. कोरेगाव भीमा हा भाग त्यांच्या अखत्यारित होता. त्यामुळे घटना घडली तेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत काय उपाययोजना केल्या होत्या. याबाबत नांगरे पाटील यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर त्यांची शनिवारी (२६ ऑगस्ट) ॲड. रोहन जमादार-माळवदकर, ॲड. राहुल मखरे आणि सरकार पक्षाचे वकील ॲड. शिशीर हिरे यांनी उलटतपासणी घेतली.
हेही वाचा >>>जलसंपदा विभागातील ४९५ कनिष्ठ अभियंते चार वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; पुण्यात साखळी उपोषण सुरू
हेही वाचा >>>तलाठी भरती परीक्षेला उशीरा येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार; संबंधितांवर कारवाईचे आदेश
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आंबेडकर यांना साक्ष देण्यासाठी आयोगाने मंगळवारी पाचारण केले आहे. तसेच तत्कालीन पुण्याच्या पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी शुक्ला यांनाही आयोगाने उलटतपासणीसाठी बोलाविले आहे. या दोघांनाही आयोगाने २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पाचारण केले आहे, अशी माहिती आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी दिली.