गुजरात येथे २००४ मध्ये झालेल्या कथित पोलीस चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ ही दहशतवादी असल्याचे डेव्हिड कोलमन हेडली याचे प्रतिज्ञापत्र त्या वेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसने न्यायालयापासून जाणीवपूर्पक लपविले होते, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. इशरत जहाँ हा केवळ बहाणा होता. तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हाच काँग्रेसचा निशाणा होता, याकडे लक्ष वेधत, न्यायालयाने काँग्रेसचा हा डाव उधळून लावला असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.
इशरत जहाँ दहशतवादी होती, असे हेडलीने विशेष न्यायालयाला गुरुवारी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) त्याने हाच जबाब दिला होता. मात्र, त्या वेळी काँग्रेस सरकारने ही बाब का दडवून ठेवली, असा प्रश्नही जावडेकर यांनी उपस्थित केला. सहा वर्षांपूर्वी हेडलीच्या जबाबाचे प्रतिज्ञापत्र का बदलले याचाही जाब काँग्रेसला द्यावाच लागेल, असेही ते म्हणाले.
इशरतला शहीद ठरविण्याचा प्रयत्न करीत जितेंद्र आव्हाड हे इशरतच्या घरी धनादेश घेऊन गेले होते. ही भूमिका गुन्हेगारांना पाठीशी घालणारी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारी आहे. इशरत जहाँ केवळ बहाणा होता. पण, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हाच काँग्रेसचा निशाणा होता. आता या विषयावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करणे हा ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ असाच प्रकार आहे, अशी टीकाही जावडेकर यांनी केली.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणीत छात्र संघटनेच्या ‘जंग चलेगी जंग चलेगी भारत की बरबादी तक’ अशा घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, या प्रश्नावर काँग्रेस गप्प असून कम्युनिस्टांची वाचाच बसली आहे. एरवी कोणत्याही प्रश्नावर बोलणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे छुपे समर्थन आहे का, असा प्रश्न प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला. छात्र संघाच्या अध्यक्षाला अटक झाल्यानंतरही काँग्रेस आणि डाव्यांचे मौन काय दर्शविते? देशभक्ती आणि दहशतवादाच्या मुद्दय़ावर राजकारण केलेले लोकांना आवडणार नाही हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी ध्यानात घेतले पाहिजे, असेही जावडेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
इशरत जहाँ दहशतवादी असल्याचे प्रतिज्ञापत्र काँग्रेसने न्यायालयापासून लपविले – प्रकाश जावेडकर
देशभक्ती आणि दहशतवादाच्या मुद्दय़ावर राजकारण केलेले लोकांना आवडणार नाही हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी ध्यानात घेतले पाहिजे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-02-2016 at 03:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash javadekar slams congress and communists