घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पंजाबी साहित्यिक गुरु दयाल सिंग व्यासपीठावर असतील.
संमेलनाच्या संयोजकांतर्फे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासंबंधी निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणाचा बादल यांनी स्वीकार केला असून ते संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे पत्रही संयोजन समितीला मिळाले आहे. त्याचप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पंजाबी साहित्यिक गुरु दयाल सिंग हेदेखील उद्घाटन कार्यक्रमास व्यासपीठावर असतील, अशी माहिती स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी गुरुवारी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विश्व साहित्य संमेलनासाठीचा निधी दुप्पट करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. राज्य सरकारकडे दरवर्षी मागणी करण्याऐवजी कायमस्वरूपी अध्यादेश काढून राज्यातील आणि राज्याबाहेरील साहित्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करावी, अशी मागणीही तावडे यांच्याकडे करण्यात आली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन आणि भारत देसडला यांनी मुंबई येथे जाऊन तावडे यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. विधानसभा निवडणुकीपूर्वीच तावडे यांची घुमान येथील नियोजित साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र, आता तावडे हे राज्याचे सांस्कृतिकमंत्री असून मराठी भाषा विभागाचा कार्यभारही त्यांच्याकडेच असल्याने त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले.