प्रमिलाताई ढेरे यांची भावना

पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास करणारे बंधू डॉ. रा. चिं. ढेरे यांचे कार्य डोंगराएवढे आहे हे मी पूर्वीच ओळखले होते. मी आणि वहिनी, आम्ही केवळ खारीचा वाटा उचलत अण्णांना आमच्या कुवतीप्रमाणे सहाय्य केले.  अण्णांची बहीण आणि डॉ. अरुणा ढेरे यांची आत्या हीच आयुष्यातील सर्वात मोठी पदवी असल्याची भावना प्रमिला ढेरे यांनी सोमवारी व्यक्त केली.

जन्मदा प्रतिष्ठान आणि स्वानंदी पुणे यांच्यातर्फे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि ज्येष्ठ लेखिका शकुंतला फडणीस यांच्या हस्ते प्रमिला ढेरे यांना तपस्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. जन्मदा प्रतिष्ठानचे मिलिंद सबनीस, स्वानंदी पुणे संस्थेच्या अपर्णा केळकर या वेळी उपस्थित होत्या. उत्तरार्धात ‘समजुतीच्या काठाशी..’ या अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित मैफिलीमध्ये त्यांच्यासह डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी,अपर्णा केळकर, अनुराधा जोशी, अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, स्नेहल दामले, मिलिंद गुणे, आनंद कुऱ्हेकर यांचा सहभाग होता.

ढेरे म्हणाल्या, आयुष्यात धन मिळाले नाही याची खंत वाटली नाही. अनेकांच्या प्रेमाच्या जोरावर सर्वजण आयुष्य संपन्न आणि सन्मानाने जगलो.

अरुणा ढेरे यांच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदामागील रहस्य आज समजले, असे सांगून फडणीस म्हणाले, अरुणा ढेरे यांना त्यांच्या शालेय जीवनात प्रमिलाताई यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून भरतकाम, कशिदाकाम केले असणार. साहित्य संमेलनापूर्वी उठलेल्या वादळाला अरुणा कशी तोंड देणार असा प्रश्न मनात आला होता. संपूर्ण महाराष्ट्र तिच्यामागे उभा राहिला. कोणत्याही परिस्थितीत तोल न जाणे हा ढेरे कुटुंबाचा वारसा आहे.

Story img Loader