संगीताची उत्पत्ती सामवेदातून झाली आहे. पं. विष्णू नारायण भातखंडे आणि पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी या कलेला ग्रांथिक स्वरूप प्राप्त करून दिले. मात्र, आविष्कारामुळे संगीत कला केवळ ग्रांथिक न राहता बहरली, अशी भावना ज्येष्ठ सारंगीवादक पं. रामनारायण यांनी रविवारी व्यक्त केली.
किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांचे ७५वे स्मृतिवर्ष आणि ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सरस्वती संगीत अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित विशेष सांगीतिक मैफलीमध्ये पं. रामनारायण यांच्या हस्ते प्रसिद्ध हार्मोनियमवादक आणि गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरस्वतीबाई राणे यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर, सुरेश साखवळकर, प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक निशिकांत बडोदेकर, आमदार चंद्रकांत मोकाटे याप्रसंगी उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीतर्फे डीएसके फाऊंडेशनच्या सहकार्याने निर्मिती करण्यात आलेल्या उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांवरील लघुपटाच्या सीडीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.
पं. रामनारायण म्हणाले, लाहोर आकाशवाणी येथे स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम करताना तेथे हिराबाई बडोदेकर आणि पं. सुरेशबाबू माने यांच्याशी परिचय झाला. राग-रागिण्यांमुळे शास्त्रीय संगीताची ओळख आहे. हे संगीत श्रद्धा आणि भक्तिपूर्वक ऐकले जाते. सारंगीची भाषा कंठसंगीताची आहे. उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब, उस्ताद अब्दुल वहीद खाँसाहेब, उस्ताद फैयाज खाँसाहेब हे दिग्गज कलाकार सारंगीवादक होते. सारंगीच्या प्रेमाने माझ्यातील गायकावर मात केली. परमेश्वराची आराधना करण्याचा संगीताहून दुसरा उत्तम मार्ग नाही.
सकाळच्या सत्रात शौनक अभिषेकी आणि श्रीनिवास जोशी यांचे, तर सायंकाळच्या सत्रात सुरेश साखवळकर, आशा खाडिलकर यांचे गायन झाले. राकेश चौरासिया यांच्या बासरीवादनाने मैफलीची सांगता झाली.