टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेचा प्रेरणादायी प्रवास
टेनिसची रुजवात मेट्रो शहरांची ओळख असलेल्या जिमखाने आणि क्लब्समध्ये होते. म्हणूनच निमशहरी तसेच ग्रामीण भागात टेनिसचा प्रसार आणि प्रचार मर्यादित आहे. मात्र इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर मोठी भरारी घेता येते हे बार्शीकर टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेने सिद्ध केले आहे. सोलापूरजवळचे बार्शी शहर कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. याच बार्शीत पहिल्यांदा टेनिसची रॅकेट हाती घेतलेली प्रार्थना रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघाची निवड केली. महिला दुहेरीत सानियाची सहकारी म्हणून प्रार्थनाची निवड करण्यात आली आहे. छोटय़ा शहरातून मोठे क्रीडापटू घडण्याच्या आधुनिक परंपरेत प्रार्थनाचे नाव आता समाविष्ट झाले आहे.
प्रार्थनाची टेनिसची आवड जपण्यासाठी तिच्या वडिलांनी सोलापूरला बदली करून घेतली. शासकीय आस्थापनात अभियंता म्हणून काम करत असताना प्रार्थना फॅक्टरीच्या आवारात विश्रांती घेत असे. तिथल्या रिकाम्या गोदामात तुटपुंज्या सुविधांसह तिने टेनिसचा सराव सुरू केला. अशा वातावरणात कारकीर्दीची सुरुवात केलेल्या प्रार्थनाने तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील स्पर्धामध्ये दिमाखदार प्रदर्शन करत वाटचाल केली. दमदार प्रदर्शनाच्या बळावर प्रार्थनाची फेड चषकासाठी तसेच आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात निवड झाली.
२०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सानिया मिर्झासह खेळणाऱ्या प्रार्थनाने कांस्यपदक पटकावले होते. गेली दीड वर्ष प्रार्थना हैदराबाद येथील सानिया मिर्झा अकादमीत इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. याच कालावधीत तिने अकरा स्पर्धांमध्ये जेतेपदावर नाव कोरले. प्रार्थना सध्या फ्रान्समध्ये आयोजित स्पर्धेत खेळत आहे. प्रार्थनाला टेनिसमध्ये कारकीर्द करता यावी यासाठी तिच्या वडिलांनी शासकीय नोकरीला रामराम ठोकून तिच्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा